(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LPG Cylinder Price Hike : महागाईचा सर्वसामान्यांना चटका; घरगुती सिलेंडरचे दर पुन्हा कडाडले
Domestic LPG Cylinder Price Hike : गेल्या आठ महिन्यांत सिलेंडरच्या किमतींमध्ये 190 रुपयांची वाढ करण्यात आली असून विनाअनुदानित 14.2 किलोंच्या सिलेंडरवर 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Domestic LPG Cylinder Price Hike : महागाईमुळं सर्वसामान्य माणूस आधीच हवालदिल झाला आहे. अशातच सर्वसामान्य माणसाला आणखी एक झटका लागला आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती पुन्हा एकदा कडाडल्या आहेत. विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतींमध्ये बुधवारी म्हणजेच, 6 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. विनाअनुदानित 14.2 किलोंच्या सिलेंडरवर 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरवाढीनंतर दिल्लीत विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 899 रुपये झाली आहे. तर 5 किलोंच्या सिलेंडरची किंमत 502 रुपये झाली आहे.
दिल्ली-मुंबईमध्ये विनाअनुदानित घरगुती एलपीएजी सिलेंडरची किंमत 884.50 रुपयांवरुन आता 899.50 रुपयांवर पोहोचली आहे. तर पाटनामध्ये आता एलपीजी सिलेंडरची किंमत हजार रुपयांच्या आसपास पोहोचली आहे.
केवळ याच वर्षाबाबत बोलायचं झालं तर 1 जानेवारी रोजी गॅस सिलेंडर 694 रुपयांना होता. 1 सप्टेंबर रोजी 884 रुपये एवढी किंमत होती. 17 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरमध्ये 15 दिवसांत 50 रुपयांनी दरवाढ झाली. म्हणजेच, 8 महिन्यांमध्ये 190 रुपयांनी सिलेंडर महाग झाला आहे.
यावर्षी घरगुती गॅस सिलेंडर 190 रुपयांनी महागला
एक जानेवारीपासून आतापर्यंत आठ महिन्यांमध्ये सिलेंडच्या किमतींमध्ये 190 रुपयांची वाढ झाली आहे. एक जानेवारी रोजी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 694 रुपये होती. आता दर वाढून 884.5 रुपयांवर पोहोचले आहेत. 2021 मध्ये फेब्रुवारी महिन्यात सिलेंडरचे दर वाढून 719 रुपये इतकी झाली आहे. त्यानंतर सिलेंडच्या किमती 15 फेब्रुवारी रोजी 769 रुपये, 25 फेब्रुवारी रोजी 794 रुपये, 1 मार्च रोजी 819 रुपये, 1 एप्रिल रोजी 809 रुपये, 1 जुलै रोजी 834.5 रुपये, 18 ऑगस्ट रोजी 859.5 रुपये इतक्या होत्या.
दरम्यान, तेल कंपन्यांनी दर महिन्याला एलपीजी सिलेंडरच्या किमतींची समिक्षा करतात. त्यानंतर किमती वाढवणं किंवा किंमतींमध्ये घट करणं यासंदर्भात निर्णय घेण्यात येतो. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असतो. याच कारणामुळे गॅसच्या किमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळतो. सध्या केंद्र सरकार एका वर्षात ग्राहकांना 12 घरगुती गॅस सिलेंडरवर अनुदान देतं. जर एखादा ग्राहक याहून अधिक वापर करत असेल तर त्याला बाजारभावाने खरेदी करावी लागते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :