Terrorist Arrested : भारतात स्फोट घडवण्याचा तयारीत असलेल्या सहा दहशतवाद्यांना अटक, दोघांचं पाकिस्तानात ट्रेनिंग
पाकिस्तान सपोर्टेड दहशतवादी गट दिल्ली आणि जवळपासच्या भागात स्फोट घडवण्याचा कट आखत आहेत आणि त्यांचं लक्ष्य गर्दीची ठिकाणं होती.
Terrorist Arrested : दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून चौघांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. स्पेशल सेलला माहिती मिळाली होती की पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट दिल्ली आणि जवळपासच्या भागात स्फोट घडवण्याचा कट आखत आहेत आणि त्यांचं लक्ष्य गर्दीची ठिकाणं आहेत.
स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुमार कुशवाह म्हणाले की, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तान सपोर्टेड दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. दोघांनी पाकिस्तानातून प्रशिक्षण घेतले होते. दहशतवाद्यांकडून स्फोटके आणि शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत.
सीपी नीरज ठाकूर म्हणाले की, आज दहशतवादाविरोधातील मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. मल्टीस्टेट ऑपरेशनमध्ये आम्ही सहा जणांना अटक केली आहे. समीर, लाला, जीशान कमर, ओसामा, जान मोहम्मद अली शेख आणि मोहम्मद अबू बकर यांना अटक करण्यात आली आहे. विशेष गोष्ट म्हणजे या सहा पैकी दोन जण असे आहेत जे यावर्षी पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन परतले आहेत. आम्हाला केंद्रीय एजन्सीकडून इनपुट मिळाले होते की भारताच्या काही शहरांमध्ये दहशतवादी घटना घडवण्याचे षड्यंत्र सीमेपलिकडून रचलं जात आहे. ही गुप्त माहिती लक्षात घेता, दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने एक विशेष टीम तयार केली जी डीसीपी प्रमोद कुशवाह यांच्या देखरेखीखाली काम करत होती
पाकिस्तानात कसे पोहोचले?
स्पेशल सीपी नीरज ठाकूर म्हणाले की, तपासात आढळून आले की हे अनेक राज्यांमध्ये पसरलेले मोठे नेटवर्क आहे. आज सकाळी हे ऑपरेशन पूर्ण करून आम्ही अनेक राज्यांमध्ये छापे टाकले. सर्वात आधी महाराष्ट्रातील समीर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याला कोटा येथे एका ट्रेनमध्ये अटक करण्यात आली. यानंतर दिल्लीत दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीच्या आधारे यूपीमधून तीन जणांना अटक करण्यात आली. यापैकी दोन लोक यावर्षी एप्रिलमध्ये मस्कतला गेले होते. तेथून त्यांना जहाजातून पाकिस्तानात नेण्यात आले. तेथे ते एका फार्म हाऊसमध्ये राहत होते. येथेच त्यांना स्फोटकं बनवण्याचे आणि इतर प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण सुमारे 15 दिवसांचे होते. या प्रशिक्षणानंतर हे लोक तेथून मस्कतला परत आले.
नीरज ठाकूर यांनी पुढे सांगितलं की, एक विशेष गोष्ट म्हणजे जेव्हा हे लोक मस्कतला जात होते, तेव्हा त्यांच्या गटात सुमारे 14-15 बंगाली भाषिक लोक होते. ज्यांना देखील प्रशिक्षणासाठी नेण्यात आले होते. तिथून परत आल्यानंतर या दहशतवाद्यांनी स्लीपर सेल्ससारखे काम सुरू केले. येथे दोन टीम तयार केल्या असल्याची माहिती समोर येत आहे. यातील एक टीम दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम को ऑर्डिनेट करत होता. सीमेपलीकडून येणारी शस्त्रे भारतातील विविध शहरांमध्ये लपवून ठेवणे हे या टीमचे काम होते. त्याचे दुसरे काम निधी गोळा करणे होते. महाराष्ट्रातून अटक केलेला समीर आणि यूपीमधून अटक करण्यात आलेला लाला नावाचा व्यक्ती या अंडरवर्ल्ड ग्रुपचा भाग होता.