Jammu Blast : दहशतवादी ड्रोनचं खरं लक्ष्य एटीसी आणि MI-17 हेलिकॉप्टर, दोन संशयित NIA च्या ताब्यात
Jammu Blast : जम्मूच्या एयरफोर्स स्टेशनवर शनिवारी जो हल्ला झाला त्याचं खरं लक्ष्य हे एयर ट्रॅफिक कन्ट्रोल आणि MI-17 हेलिकॉप्टर असल्याचं समोर आलं आहे.
नवी दिल्ली : जम्मूच्या एयरफोर्स स्टेशनवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी मोठा खुलासा झाला आहे. ड्रोनच्या माध्यमातून झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचं खरं लक्ष्य हे एयर ट्रॅफिक कन्ट्रोल आणि MI-17 हेलिकॉप्टर असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी NIA ने दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
जम्मूच्या टेक्निकल विमानतळ परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास दोन स्फोट झाले होते. या स्फोटांनंतर लागोलग NIA ने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली. त्यामधून असं समोर आलं की या ड्रोन हल्ल्याचे लक्ष्य हे एयर ट्रॅफिक कन्ट्रोल म्हणजे एटीसी आणि MI-17 हेलिकॉप्टर होतं. पण हे लक्ष्य चुकलं. एका ड्रोनमध्ये जवळपास पाच किलो विस्फोटक भरली होती तर दुसऱ्या ड्रोनमध्ये त्यापेक्षा थोड्या कमी वजनाची विस्फोटं भरली होती असंही तपासातून समोर आलं आहे. गेल्या वर्षी अशाच प्रकारचा ड्रोन हल्ला करण्यात आला होता.
शनिवारी झालेल्या या हल्ल्यामध्ये दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं एयर फोर्सच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. एयर चीफ मार्शल हे सध्या बांग्लादेशच्या दौऱ्यावर असून ते या तपासाची संपूर्ण माहिती घेत आहेत. काल ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणी एयर सर्व्हेलंसची सर्व उपकरणं, एयर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम आणि एमआय 17 हेलिकॉफ्टर होतं.
या प्रकरणाचा अधिक तपास NIA आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून ते टेरर आउटफिट्सचे ऑपरेटर असल्याचं सांगण्यात येतंय. या दोघांनी शनिवारच्या हल्ल्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडल्याचंही सांगण्यात येतंय.
महत्वाच्या बातम्या :