(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India China Tension: तवांगनंतर सीमेजवळील 'या' भागातही चीन आगळीक करण्याच्या तयारीत?
India China Tension: तवांग सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला तरी चीनकडून पुन्हा आगळीक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या डोकलामजवळील भागात चीन घुसखोरी करू शकते.
India China Tension: आक्रमक विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या चीनने (China) तवांग सेक्टरमध्ये (Tawang Sector) घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता भारताच्या आणखी एका भागाजवळ आगळीक करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चीनकडून आता सिक्कीम सेक्टरमध्ये डोकलाममध्ये (Doklam) चीनकडून आगळीक करण्यात येऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. चिनी सैन्याने जामफेरी रिजपर्यंत पोहचण्यासाठी टोरसा ओढ्याजवळ पूल उभा केला आहे.
डोकलामच्या मुद्यावरून 2017 मध्ये भारत-चीनमध्ये तणाव (India China Tension) निर्माण झाला होता. वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनने डोकलाम जवळ पूल आणि इतर बांधकाम केले आहेत. ही बांधकामे भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकतात. मागील काही महिन्यांपूर्वी चीनने या भागात गाव वसवली असल्याचे समोर आले होते.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने डोकलामजवळील भागात एका पुलाचे बांधकाम केले आहे. त्याशिवाय, नवीन रस्तेदेखील बांधले आहेत. सॅटेलाइट इमेजनुसार, भारत-भूतान-चीन या ट्राय जंक्शनपासून जवळपास 9 किमी दूर अंतरावरील भूतानच्या सीमेजवळ चीनकडून विस्तारवादी भूमिका घेतली जात आहे. चीनने 2020 मध्ये भूतानच्या भागात पंगडा हे गाव वसवले होते. 2021 मध्ये या गावाचा विस्तार झाल्याचे दिसून आले.
भारतासाठी धोक्याची घंटा
भारतासाठी डोकलाम हा रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. चिनी सैन्य जामफेरी रिजपर्यंत दाखल झाल्यास भारताच्या सिलिगुडी कॉरिडॉरला धोका निर्माण होईल. जामफेरी रिजपर्यंत पोहचल्यास चिनी सैन्य वरचढ ठरू शकते. चिनी सैनिक जर जामफेरी रिजवर पोहोचले तर त्यांना भारतीय लष्कराच्या डोकला पोस्टपर्यंत पोहोचण्यास फारसा वेळ लागणार नाही. सिलीगुडी कॉरिडॉर जामफेरी रिजच्या टप्प्यात येईल.
भारताचा सिलीगुडी कॉरिडॉर सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मार्ग 22 किमी अतिशय अरुंद मार्ग आहे. यातून संपूर्ण ईशान्य भाग देशाच्या इतर भागाशी जोडला जातो. या भागाला चिकन नेक असेही म्हटले जाते.
वर्ष 2017 मध्ये चीनने डोकलाममधील जामफेरी रिजपर्यंत रस्ता बनवण्याचा प्रयत्न केला होता. हा रस्ता तयार झाला असता तर चिनी लष्कराची वाहने थेट जामफेरी रिजपर्यंत पोहोचू शकणार होती. त्यावेळी भारतीय लष्कराने चिनी सैनिकांना रस्त्याचे काम करण्यापासून रोखले होते. जवळपास 72 दिवस दोन्ही देशांमध्ये या मुद्यावरून तणाव निर्माण झाला होता. अखेर चर्चांच्या अनेक फेऱ्यानंतर चीनने माघार घेतली. त्यानंतर चिनी सैन्याने डोकलाममध्ये अनेक पायाभूत सुविधा आणि हेलिपॅड बांधले. सुमारे 600 सैनिकांची कायमस्वरूपी तैनातीदेखील केली.