(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India China Clash: बर्फवृष्टीनंतर चीनने साधली घुसखोरीची संधी; कसा झाला तवांगमधील संघर्ष, वाचा
India China Clash: तवांगमधील प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा चिनी सैनिकांचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला. चिनी सैन्याने या घुसखोरीसाठी आधीच कट आखला होता.
India China Clash: अरुणाचल प्रदेमधील (Arunachal Pradesh) तवांग सेक्टरमध्ये (Tawang Sector) चिनी सैन्याच्या (China PLA) घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी (Indian Army) उधळून लावला. चीनच्या घुसखोरीला रोखताना दोन्ही बाजूने संघर्ष झाला. यामध्ये दोन्ही बाजूचे सैन्य जखमी झाल्याचे (India China Clash) वृत्त आहे. सहा भारतीय जवान जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्यावर गुवाहाटीमधील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवळपास 300 ते 400 चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. चिनी सैन्यातही अनेकजण जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. 9 डिसेंबर रोजी ही घटना घडली. तवांगमधील प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडण्यासाठी चीनने आधीच पूर्ण तयारी केली होती. एका संधीच्या शोधात चिनी सैन्य होते.
चिनी सैन्याने कुठून घुसखोरी केली?
भारत आणि चीनदरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा अद्याप निश्चित नाही. दोन्ही देशांदरम्यान 3000 किमीची प्रत्यक्ष ताबा रेषा (India China LAC) आहे. 9-10 डिसेंबरच्या मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास तवांग पूर्व येथील Yangtse पॉईंटवर भारत-चीनच्या सैन्यात संघर्ष झाला. 'द इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, Yangtse पॉईंट हा एक ओढा आहे. या ओढ्याच्या एका बाजूला भारतीय सैन्य आणि दुसऱ्या बाजूला चिनी सैन्य आहेत. चिनी सैन्याकडून या ठिकाणी घुसखोरी होईस, असे कोणतेही संकेत, हालचाली दिसून आल्या नाहीत. 9 डिसेंबर रोजी मध्यरात्री 300 ते 400 चिनी सैन्याने ओढा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली. या दरम्यान, हाणामारीचा आवाज, गोंधळ ऐकू आल्यानंतर तातडीने 70 ते 80 जवानांना पाठवण्यात आले. भारतीय सैन्याने चिनी घुसखोरांना हुसकावण्यासाठी तयारी केली होती.
भारत आणि चीनच्या सैन्यात काही तास हाणामारी सुरू होती. या संघर्षात एकही गोळी झाडली गेली नाही. मात्र, लाठी-काठी, दगडांचा वापर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतीय सैन्याने मोठ्या निर्धाराने चिनी सैन्याला आपल्या हद्दीतून हुसवाकाले.
संधीच्या शोधात होता चीन
'द इंडियन एक्स्प्रेस'ने भारतीय सैन्यातील वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैन्य घुसखोरीसाठी सज्ज होते. ज्या ठिकाणी संघर्ष झाला, त्या ठिकाणी घनदाट जंगल आहे. चीन आपल्या बाजूने पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांपूर्वी या भागात बर्फवृष्टी झाली. त्याशिवाय, ढग दाटून आले होते. त्यामुळे भारतीय सॅटेलाइट्सला चिनी सैन्याच्या हालचाली टिपण्यास अडथळे येत होते. त्यानंतर भारतीय सैन्याने रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF) सिग्नल जिओलोकेशन इक्पिमेंटचा वापर करून सॅटेलाइट इमेज घेतल्या आहेत. सध्या त्यांचे विश्लेषण करण्यात येत आहे.
चीनने ज्या ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न केला, तो भाग समुद्रसपाटीपासून 14 ते 17 हजार फूट उंच आहे. चीनकडून याआधीदेखील घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र, भारतीय सैन्याने हा डाव उधळून लावला होता. त्यामुळे चिनी सैन्याने रात्रीची वेळ निवडली. मात्र, सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने चिनी सैन्याचा मध्यरात्रीचा घुसखोरीचा डाव उधळून लावला.
15 जून 2020 रोजी, गलवानमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यावेळी भारताच्या 20 जवानांनी प्राणाचे बलिदान दिले होते. यापूर्वी 1967 मध्येही दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. 1967 मध्ये नाथुला येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे 88 सैनिक हुतात्मा झाले होते. तर, चीनकडून 300 हून अधिक सैनिक ठार झाले होते.
अरुणाचलवर चीनचा दावा
चीनकडून अरुणाचल प्रदेशवर दावा करण्यात येतो. अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा एक भाग असल्याने तो चीनकडे असावे असे चीनकडून सांगण्यात येते. तर, अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग असल्याचे भारताकडून चीनला ठणकावून सांगण्यात येते.