(Source: ECI/ABP News/ABP Majha)
National Herald Case : काँग्रेसच्या पाच नेत्यांना ईडीचे समन्स, नॅशनल हेराल्ड प्रकरणी उद्या होणार चौकशी
National Herald Case : ईडीने काँग्रेसच्या पाच नेत्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी या नेत्यांची उद्या चौकशी होणार आहे.
National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने काँग्रेसच्या पाच नेत्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ईडीने या नेत्यांना उद्या म्हणजे मंगळवारी दिल्लीतील ईडीच्या मुख्य कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. अंजन कुमार, मोहम्मद अली शब्बीर, गीता रेड्डी, सुदर्शन रेड्डी आणि गली अनिल या नेत्यांचा यात समावेश आहे.
काँग्रेस नेते राहुल आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक असताना या नेत्यांनी त्यात देणग्या दिल्या होत्या. त्याच्या तपशीलासाठी ईडीने या नेत्यांना समन्स बजावले आहे, अशी माहिती ईडीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. याआधी रविवारी ईडीने कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांना काँग्रेस पक्षाच्या मालकीच्या नॅशनल हेराल्डमध्ये सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग चौकशीत चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने त्यांना 7 ऑक्टोबर रोजी दिल्लीत हजर राहण्यास सांगितले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा कर्नाटकात दाखल झाली असताना हे समन्स आले आहे. यात्रेत शिवकुमार देखील सहभागी झाले आहेत. 30 सप्टेंबर रोजी ही यात्रा कर्नाटकात दाखल झाली आहे.
ईडीने आता हेराल्ड प्रकरणात चौकशीसाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील अनेक काँग्रेस नेत्यांना समन्स बजावले आहेत. यंग इंडियन हा नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचा मालक आहे. ऑगस्ट महिन्यात यंग इंडियनचे कार्यालय सील करण्याबरोबरच ईडीने डझनभर ठिकाणी छापे टाकले होते.
या नेत्यांचीही झाली आहे चौकशी
नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात गेल्या काही महिन्यांत ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि पवन बन्सल यांसारख्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची चौकशी केली आहे. या प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची अनेक दिवस चौकशी करण्यात आली. ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले होते.