एक्स्प्लोर
'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी होऊन उपजिल्हाधिकारी अडचणीत
प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुराधा अग्रवाल यांची निवड ‘कौन बनेगा करोडपती’साठी झाली. या कार्यक्रमात प्रश्नांची उत्तर देऊन पैसेही मिळवले, मात्र परत आल्यानंतर त्यांच्या बाबतीत जे झालं, त्यामुळे अनुराधा यांना धक्काच बसला.
रायपूर : छत्तीसगडमधील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकाऱ्याची सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी होऊन चांगलीच अडचण झाली. विषय एवढा गंभीर बनला, की छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.
मंगोली जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुराधा अग्रवाल यांची निवड ‘कौन बनेगा करोडपती’साठी झाली होती. भोपाळमध्ये ऑडिशन झाल्यानंतर अनुराधा अग्रवाल यांना कार्यक्रमाच्या शुटिंगसाठी मुंबईला बोलावण्यात आलं.
कार्यक्रमाला जाण्यापूर्वीच आईचं निधन
अनुराधा दिव्यांग आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी होऊन तिथे मिळालेल्या पैशातून भावाच्या किडनीवर उपचारासाठी पैसे जमा करणं अनुराधा यांचा उद्देश होता. या कार्यक्रमाच्या शुटिंगच्या एक दिवस अगोदरच अनुराधा यांच्या आईचं निधन झालं. मात्र कुटुंबीयांच्या सल्ल्यामुळे अनुराधा मुंबईला रवाना झाल्या.
उत्तरं देऊन पैसे मिळवले, मात्र सरकारी औपचारिकतांमुळे अडचण
अनुराधा यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन अमिताभ बच्चन यांच्यासमोरच्या हॉट सीटवर बसून प्रश्नांची खणखणीत उत्तरं दिली. त्यातून त्यांना चांगले पैसेही मिळाले. मात्र मुंबईहून परतल्यानंतर त्यांना समजलं की कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना परवानगीच देण्यात आली नव्हती.
अनुराधा यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परवानगी मिळवली होती. मात्र वेळेवर पत्र न मिळाल्यामुळे त्यांनी सुट्टी टाकून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र अनुराधा यांचा ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय अमान्य करण्यात आल्याचं पत्र सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांनी अनुराधा यांना पाठवलं.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अनुराधा यांचं प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. प्रशासकीय अधिकाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी होण्याची परवानगी अधिकृतपणे परिपत्रक जारी करुन दिली जाते. मात्र राज्यातील एखाद्याची बुद्धी राष्ट्रीय स्तरावर दाखवण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना रोखलं जातं, असा घणाघात काँग्रेसने भाजप सरकारवर केला.
या प्रकरणाने राजकीय वळण घेतल्यानंतर सरकारने नमतं घेत अनुराधा यांना परवानगी दिली. मुख्यमंत्री रमन सिंह यांनी याबाबतची औपचारिकता पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
सरकारने परवानगी दिल्यामुळे आता भावावर उपचार करणार असल्याचं अनुराधा यांनी ‘बीबीसी’शी बोलताना सांगितलं. सोनी टीव्हीवरील या भागाचं प्रक्षेपण 20 सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement