Corona Update: गेल्या चोवीस तासात 10 हजारांहून कमी नवे रुग्ण, 75 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण
Coronavirus: देशातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत सातत्याने घसरण सुरु असून गेल्या चोवीस तासात 10 हजारांहून कमी नव्या रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत 75 लाख लोकांचे कोरोना लसीकरण (Corona vaccination) पूर्ण झाले आहे.
नवी दिल्ली: कोरोनाच्या बाबतीत देशासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अजूनही कोरोनाचे संकट संपले नसले तरी देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. गेल्या चोवीस तासात नव्या कोरोना रुग्णांची संख्या दहा हजारांहून कमी झाल्याचं दिसून आलं आहे. तसेच आतापर्यंत 75 लाख लोकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे.
कोरोनाचा सध्याचा मृत्यूदर हा 1.43 टक्के इतका आहे तर त्यातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही 97.26 टक्क्यांवर पोहचलं आहे. देशातील कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही 1.31 टक्के इतकी आहे. गुरुवारी एका दिवसात 4.87 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाची रुग्णसंख्या आता एक कोटी आठ लाख 80 हजार इतकी झाली आहे. आतापपर्यंत कोरोनामुळे एक लाख 55 हजार 447 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एक कोटी पाच लाख 89 हजार लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता एक लाख 35 हजार इतकी झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
धक्कादायक! वर्ध्यातील हिंगणघाटच्या निवासी शाळेतील 75 विद्यार्थी कोरोनाबाधित
17 राज्यात एकही मृत्यू नाही कोरोनाची तीव्रता आता कमी होत असल्याचं दिसून येतंय. गेल्या चोवीस तासात देशात 87 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. यात सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्र राज्यात झाले आहेत. देशातील 17 राज्ये असे आहेत की या राज्यात काल एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. यामध्ये अंदमान व नोकोबार द्वीप समूह, अरुणाचल प्रदेश, आसाम, दादरा नगर हवेली आणि दमन दीव, गुजरात, हरियाणा, लड्डाख, लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, नागालॅंड, मिझोरम, ओडीशा, सिक्किम, तेलंगना, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे.
आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत एकूण 20 कोटी 47 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 7.65 लाख चाचण्या या गुरुवारी एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सर्व राज्यात आणि केंद्र शासित प्रदेशात कोरोना व्हायरसचा रिकव्हरी रेट हा 90 टक्क्यापेक्षा जास्त आहे.
कोरोना लसींच्या साठवणूकीसाठी 'गोदरेज अँड बॉइस'कडून 'अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर'ची निर्मिती