(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress On PM Modi Speech : PM मोदींचा घराणेशाहीवर हल्लाबोल, काँग्रेसने म्हटलं, हे भाषण म्हणजे...
Congress On PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषणं हे भाजपमधील अडचणींवर भाष्य करणारे असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली आहे.
Congress On PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात घराणेशाहीवर टीका केल्यानंतर काँग्रेसने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलेच मंत्री आणि त्यांच्या मुलांवर हल्लाबोल केला असून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असे बोलणं चुकीचे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ वर्षाच्या कार्यकाळातील प्रगतीचा लेखाजोखा मांडतील अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या भाषणाने निराशा झाली आहे. आजचा दिवस राजकारणासाठी नव्हता. मात्र, सध्या काही औचित्य, परंपरा बदलल्या जात असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. मागील आठ वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याच शब्दांनी घायाळ होत चालले असल्याचे खेरा यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी भाषण थकलेले
पवन खेरा यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांचे भाषण थकलेले होते. त्यामध्ये कोणताही भाव दिसून आला नाही. यापूर्वी दिलेली आश्वासने, घोषणा पंतप्रधानांना सतावत असतील. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाचे काय झाले, काळा पैसा परत आला का, रोजगार आणि 15 लाख रुपयांचे काय झाले असा प्रश्नही खेरा यांनी उपस्थित केला.
भाजपच्या अंतर्गत मुद्यावर भाष्य
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना काँग्रेसने म्हटले की, पंतप्रधानांनी यापूर्वी केलेल्या घोषणा, आश्वासनांमुळे त्यांना शांत झोप लागत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाजपमधील अंतर्गत समस्यांवर भाष्य करत होते. भाजपमधील एका व्यक्तिने लॉर्ड्समध्ये शतक झळकावले असेल. त्यामुळे ती व्यक्ती क्रिकेट मंडळात मोठ्या पदावर आहे, एका व्यक्तिचा मुलगा एका मोठ्या थिंकटँकमध्ये आहे. पंतप्रधान मोदींनी भाषणात केलेला हल्लाबोल हा आपल्याच मंत्र्यांविरोधात आणि त्यांच्या मुलांविरोधात होता का, हे स्वत: पंतप्रधान मोदी सांगतील असा टोलाही खेरा यांनी लगावला.
पंतप्रधान मोदींनी घराणेशाहीबाबत काय म्हटलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात (PM Modi Speech) घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीमुळे गुणवत्तेवर अन्याय केला असल्याचे म्हटले. राजकीय क्षेत्रातील घराणेशाहीचे प्रतिबिंब इतर क्षेत्रातही उमटत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. घराणेशाहीचा तिरस्कार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, गुणवत्तेवर अन्याय होत असल्याने घराणेशाहीचा तिरस्कार करणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, मी ज्यावेळी काका-पुतण्याशाही, घराणेशाहीबद्दल बोलतो तेव्हा लोकांना मी फक्त राजकीय क्षेत्राबद्दल बोलतोय असं वाटतं. दुर्देवाने राजकारणातील या घराणेशाहीची लागण देशातील इतर संस्थांमध्ये झाली असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. राजकारणाच्या बाहेरील घराणेशाहीमुळे देशातील गुणवत्तेचे नुकसान झाले आहे.