Bihar Election 2020 | बिहार निवडणुकीचा तिसरा टप्पा ठरवणार सरकार कोणाचे? मतदानाला सुरुवात
बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज (7 नोव्हेंबर) मतदान होत आहे. या टप्प्यात राजदने सर्वाधिक म्हणजे 46 उमेदवार उभे केले आहेत. तर नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळातील 12 मंत्र्यांचे भविष्य पणाला लागले आहे.अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाडीच्या घटना घडत आहेत.
पाटणा: बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज (7 नोव्हेंबर) मतदान होत आहे. या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. असे सांगितले जाते की, या टप्प्यातील मतदानात जो पक्ष आघाडी घेईल त्याचा सरकार बनवण्याचा दावा अधिक मजबूत होईल. यामुळे सर्वच राजकीय पक्षांत या टप्प्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी चढाओढ सुरु आहे.
तिसऱ्या टप्प्यात एनडीएच्य़ा माध्यामातून संयुक्त जनता दलाने आपले 37 उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले आहेत तर भाजपने 35 उमेदवार उभे केले आहेत. महागठबंधनच्या माध्यमातून राष्ट्रीय जनता दलाने सर्वात जास्त म्हणजे 46 उमेदवार उभे केले आहेत तर कॉंग्रेसने 25 उमेदवार उभे केले आहेत. त्याचसोबत लोक जनशक्ती पक्षाच्या 42 उमेदवारांचेही भवितव्य पणाला लागले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत या 15 जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे 24 जागा या संयुक्त जनता दलाने जिंकल्या होत्या तर राजदने 20 जागा जिंकल्या होत्या. गेल्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती. आता हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. गेल्या वेळी भाजपने या क्षेत्रातून 19 तर कॉंग्रेसने 10 जागांवर विजयाची पताका फडकवली होती.
या शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीत नितीश कुमार सरकारच्या 12 मंत्र्यांच्या सोबत एकूण 1204 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करुन एक नवे रेकॉर्ड करावे असे आवाहन केलंय तर कॉंग्रेस नेते राहुल गांधीनीही मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले आहे.
सकाळी अकरा वाजेपर्यंत 18 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या दरम्यान अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या बातम्या येत आहेत. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला घोषित होणार आहे.
ही माझी शेवटची निवडणूक: नितीश कुमार गुरुवारी पूर्णिया जिल्ह्यातील धमदाहा येथे एका सभेला संबोधित करताना नितीश कुमार म्हणाले होते की, "ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक असेल. शेवट चांगला तर सगळंच चांगलं होते."
नितीश कुमारांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी टीका केली होती. "नितीश कुमार आता थकले आहेत, त्यांना त्याचा पराभव समोर दिसतोय म्हणून ते आता मतदारांना भावनिक आवाहन करत आहेत," अशी टीका राजदच्या तेजस्वी यादव यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या: Bihar Election 2020 : बिहारच्या जनतेने घराणेशाहीला नाकारलं, जंगलराजचाही पराभव; पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा Bihar Election 2020 | कोरोना लसीच्या मोफत वाटपाचे आश्वासन देणे हे निवडणूक आचारसंहिते उल्लंघन नाही: निवडणूक आयोग