ABP Cvoter Survey: पाच राज्यांच्या निवडणुकीत कोण उधळणार विजयाचा गुलाल? सर्वेक्षणात धक्कादायक अंदाज
ABP Cvoter Opinion Polls Assembly Election 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगडमध्ये कोण विजयाचा गुलाल उधळणार, याचा अंदाज घेण्यासाठी एबीपी-सी व्होटरने सर्वेक्षण केले.
ABP Cvoter Opinion Polls : या महिन्यात मध्य प्रदेश (Madhya Pradesh Election), राजस्थान (Rajasthan Election), तेलंगणा (Telangana Election), मिझोराम (Mizoram) आणि छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh Election) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. छत्तीसगड आणि मिझोराममध्ये 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. रविवारी (5 नोव्हेंबर) दोन्ही राज्यात निवडणूक प्रचार थांबणार आहे. दरम्यान, सी व्होटरने पाचही राज्यांमध्ये एबीपी न्यूजसाठी अंतिम निवडणूक पूर्व सर्वेक्षण केले आहे.
सर्वेक्षणात पाचही राज्यांसाठी अंतिम जनमत चाचणी घेण्यात आली आहे. या सर्वेक्षणात सुमारे 63 हजार लोकांशी संवाद साधण्यात आला. हा संवाद 9 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान झाला. सर्वेक्षणातील त्रुटीचे मार्जिन अधिक उणे 3 ते अधिक उणे 5 टक्के आहे.
छत्तीसगडमध्ये कोण जिंकणार?
सर्वेक्षणानुसार, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला 45 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 43 टक्के आणि इतरांना 12 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणात काँग्रेसला 45 ते 51 जागा मिळू शकतात, तर भाजपला 36 ते 42 जागा मिळू शकतात. याशिवाय 2 ते 5 जागांवर इतर पक्षांचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.
मिझोराममध्ये कोणाची सरशी?
सर्वेक्षणानुसार, मिझोराममध्ये एमएनएफला 36 टक्के मते मिळू शकतात. त्याचवेळी काँग्रेसला 30 टक्के आणि झेडपीएमला 26 टक्के मते मिळू शकतात, तर इतरांना 9 टक्के मते मिळू शकतात. सर्वेक्षणात MNF ला 17 ते 21 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. काँग्रेसला 6 ते 10, झेडपीएमला 10 ते 14 आणि इतरांना 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशची स्थिती काय?
मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी चुरस असल्याचे चित्र आहे. 'सी व्होटर'च्या सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेशात काँग्रेसला 45 टक्के, भाजपला 42 टक्के आणि इतरांना 13 टक्के मते मिळू शकतात. 230 विधानसभेच्या जागा असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसला 118 ते 130 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी भाजपला 99 ते 111 जागा मिळतील, तर 0-2 जागा इतरांच्या वाट्याला जाऊ शकतात.
राजस्थानमध्ये सत्ता बदलाचा ट्रेंड कायम राहणार?
राजस्थानमध्ये काँग्रेसला 42 टक्के मते मिळतील, तर भाजपला 45 टक्के आणि इतरांना 13 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. राजस्थान विधानसभेच्या 200 जागांपैकी काँग्रेसला 67 ते 77 तर भाजपला 114 ते 124 जागा मिळू शकतात. तर 5 ते 13 इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. याचाच अर्थ राजस्थानमध्ये निवडणूक पूर्व अंदाजात सत्ता बदलाचा ट्रेंड कायम राहणार असल्याचे चित्र आहे.
तेलंगणात कोण जिंकणार?
दक्षिणेकडील राज्य तेलंगणामध्ये काँग्रेसला 39 टक्के मते मिळू शकतात. सर्वेक्षणानुसार, येथे भाजपला 14 टक्के मते मिळू शकतात, बीआरएसला 42 टक्के मते मिळू शकतात, तर इतरांना 6 टक्के मते मिळू शकतात. सर्वेक्षणानुसार तेलंगणात काँग्रेसला 43 ते 55 आणि भाजपला 5 ते 11 जागा मिळू शकतात. तर बीआरएसला 49 ते 61 जागा मिळतील. येथे इतर पक्षांना 4-10 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.