Chandrashekhar Bawankule : सुप्रिया सुळे ईव्हीएमवरच जिंकल्या, मग राहुल गांधींची नौटंकी का? चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर, मतदानावरही बोलले
Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलाय. यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय.

Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज शुक्रवारी (दि. 07) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात 32 लाख मतदार जोडले गेले, पण 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये 39 लाख मतदार कसे जोडले गेले, असा आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केला. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. किंबहुना पराभवाच्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. म्हणून आता ते मतदारसंख्येवर संशय घेत आहेत. खरं तर निवडणूक आयोगानं यापूर्वीच मतदार वाढीबाबत वारंवार स्पष्ट उत्तरं दिली आहेत, तरीही दिशाभूल करणारे आरोप करून लोकशाहीची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला जात आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे.
दिल्लीतील पराभव आधीच दिसतोय
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यात होणारा पराभव आधीच दिसत असल्यामुळे राहुल गांधी यांची रडारड आतापासूनच सुरू झाली आहे. जनतेनं काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना सातत्यानं नाकारलं आहे, हे वास्तव स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही. आता पराभव लपवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणं, हा निराशेचा कळस आहे.
🔸काँग्रेस नेते @RahulGandhi आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. किंबहुना पराभवाच्या त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. म्हणून आता ते मतदारसंख्येवर संशय घेत आहेत. खरं तर निवडणूक आयोगानं यापूर्वीच…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) February 7, 2025
राहुल गांधींची नौटंकी का?
खरं तर या पत्रकार परिषदेत शेजारी बसलेल्या सुप्रियाताई सुळे यांनी 'मी याच ईव्हीएमवर विजयी झाले' असं सांगितलं होतं. पण राहुल गांधी यांना नौटंकी करायची असल्यानं ते सत्य स्वीकारणार नाहीत. राहुलजी लोकशाहीवर विश्वास ठेवा, निराधार आरोप करून लोकशाहीची विटंबना करू नका. या देशातील जनतेला आपला खोटारडेपणा आता पुरता कळून चुकला आहे, असे प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना दिले आहे.

























