(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उत्तर प्रदेशातील औरैयात प्रवासी मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात; 23 जणांचा मृत्यू तर 15 जखमी
उत्तर प्रदेशातील औरैया येथून गावी परतणाऱ्या मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 23 मजुरांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील औरैयामधून गावी परतणाऱ्या मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रक एकमेकांसमोर आल्याने हा अपघात घडला. दोन ट्रक एकमेकांसमोर येऊन धडक झाली. या अपघातात 23 मजुरांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात कोतवाली परिसरातील मिहौली राष्ट्रीय महामार्गावर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये असलेले सर्व मजूर दिल्लीहून गोरखपूरला जात होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातात मृत्यू झालेल्या मजुरांच्या कुटुंबियांना 2 लाख आणि जखमी मजुरांच्या कुटुंबियांना 50 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.
देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व सेवा ठप्प आहेत. त्यामुळे देशभरात अडकलेल्या मजुरांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लॉकडाऊमुळे हातात काम नाही, तर खिशात पैसे नाही. त्यामुळे हे मजूर मिळेल त्या साधनाचा वापर करून आपल्या मूळ गावी परतण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात सध्या सुरु असलेलं स्थलांतर फाळणीनंतरचं सर्वात मोठं स्थलांतर असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, मजुरांच्या या स्थलांतरादरम्यान, अनेक भीषण अपघात होत आहे. महाराष्ट्रातही काही दिवसांपूर्वी मालगाडीच्या धडकेत मध्यप्रदेशातील मजुरांचा मृत्यू झाला होता.दरम्यान, काल उत्तर प्रदेशातील जालोन जिल्ह्यातही मजूर असलेल्या DCM गाडीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून 14 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. प्रवासी मजूर मुंबईहून परत येत होते. डीसीएममध्ये एकूण 46 प्रवासी मजूर होते.
लॉकडाऊन दरम्यान, हायवेवर हृदय पिळवटून टाकणारं दृश्य पाहायला मिळत आहे. हातात काम नाही आणि खिशात पैसे नाहीत. त्यामुळे अनेक मजूर आपल्या घरी परतण्यासाठी पायी प्रवास करत आहेत. अनेक मन हेलावणारे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परिस्थिती एवढी गंभीर आहे की, मालवाहू गाड्या, ट्रकमध्ये मजूरांना भरण्यात येत आहे. स्थलांतर करणाऱ्या मजुरांमध्ये बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या मजुरांचा समावेश अधिक आहे. तसेच पंजाब आणि हरियाणामधूनही मजूर हजारो किलोमीटर पायी प्रवास करुन आपल्या घरी परतण्यासाठी धडपडत आहेत.
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचं आवाहन
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल (शुक्रवारी) अधिकाऱ्यांना आदेश दिले होते की, 'कोणत्याही प्रवासी मजुरांना असुरक्षित पद्धतीने प्रवास करण्याची परवानगी दिली जाऊ नये. आणि आज हा अपघात घडला. आज गाजियाबाद आणि नोएडामधून मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी ट्रेनही चालवण्यात येणार आहेत. परंतु, तरिही मजूर आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारकडून मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन्स सुरु करण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या :
भुसावळला पायी जाणाऱ्या मजुरांना मालगाडीची धडक; 16 मजुरांचा मृत्यू, तर एक जण जखमी
लॉकडाऊन-4 चं स्वरुप कसं असणार, किती वाढणार? सर्व मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांना सूचना
मुंबईवरुन आजोबांना खांद्यावर घेऊन निघालेला नातू सहा दिवसांनतर वाशिममध्ये