एक्स्प्लोर
Advertisement
ग्रामदेवता : अकोल्याच्या बार्शी टाकळीचं ग्रामदैवत श्री कालंका माता
अकोला : बार्शी टाकळी तालुक्याची आध्यात्मिक ओळख येथील दोन मंदिरांनी दृढ केली आहे. एक कालंका मातेचं आणि दुसरं खोलेश्वराचे मंदिर. यापैकी कालंका माता हे बार्शी टाकळीचं ग्रामदैवत आहे. हे मंदिर जवळपास चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचं असावं असा अंदाज असल्याचं गावकरी सांगतात.
स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना, आकर्षक नक्षीकाम, दगडांवर रेखाटलेली मनमोहक आणि सुरेख चित्रं हे या मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष पटवत आहेत. हे मंदिर हेमाडपंथी शैलीचं आहे. मात्र या मंदिराला मुघलांच्या आक्रमणालाही सामोरं जावं लागलं.
कालंका देवी येथे नेमकं कशी प्रतिष्ठापीत झाली याची ठोस आख्यायिका माहित नसली तरी राक्षसांसोबतच्या युद्धानंतर कालीचा अवतार धारण केलेल्या देवीनं विश्रांतीसाठी हे ठिकाण निवडलं. तेव्हापासूनच देवी या ठिकाणी कायम विराजमान झाल्याचं जुने जाणते सांगतात.
या मंदिराबाबत आणखी एक संदर्भ सांगितला जातो. आधी या मंदिरात शंकराची मूर्ती होती असे दाखले इतिहासात सापडतात. मुघलांच्या आक्रमणानंतर इथली शंकराची मूर्ती खंडित झाली आणि या ठिकाणी माहुरची रेणुका विराजमान झाली. हीच माहुरची रेणुका माता येथे पुढे कालंका माता म्हणून प्रतिष्ठापित झाल्याचं सांगितलं जातं.
वर्षभर जिल्ह्यासह विदर्भातल्या भक्तांची मांदियाळी या मंदिरात लागलेली असते. पण दर मंगळवारी मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात. नवरात्रातील नऊ दिवसात देवी स्वतः मंदिरात वास करीत असल्याची भावना असल्याने येथे भक्तांची मोठी गर्दी झालेली असते.
शंकराची मूर्ती असतांना या मंदिरातील गवाक्षातून सकाळचे सूर्याचे पहिले किरण थेट मूर्तीवर पडत होते असं जुने जाणकार सांगतात. मात्र अतिशय सुंदर वास्तुकलेचा नमुना असणारे हे मंदिर आता सरकारी अनास्थेला बळी पडताना दिसून येते.
या मंदिराच्या देखभालीची जबाबदारी सध्या पुरातत्व विभागाकडे आहे. अनेक ठिकाणी मंदिराचं नक्षीकाम खराब झाले. तर काही भाग ढासळायला लागला आहे. मंदिर परिसरात सध्या गवताचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे भक्तांनी हे वैभव टिकवून ठेवण्याची अपेक्षा केली आहे.
आदिशक्तीची विविध रुपं कधी आपण दुर्गा, काली, चंडी, महालक्ष्मी तर महिषासुरमर्दिनी अशा स्वरुपात आपण पाहत असतो. याच भक्ती आणि उत्कठतेचं रुप म्हणजे बार्शीटाकळीची कालंकादेवी. या मातेचं दर्शन एकदा तरी घ्यायलाच हवं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
पुणे
भारत
Advertisement