Dhule News : धुळ्यातील मर्चंट नेव्हीचा कर्मचारी ओमानच्या समुद्रात बेपत्ता, कंपनीकडून कुटुंबियांना उडवाउडवीची उत्तरं, नेमकं प्रकरण काय?
Dhule News : धुळ्याच्या देऊर येथील मूळ रहिवासी आणि मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेला तरुण ओमानच्या समुद्रात बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

धुळे : देऊर येथील मूळ रहिवासी असलेला आणि मर्चंट नेव्हीमध्ये (Merchant Navy) कार्यरत असलेला यश देवरे (yash Deore) हा तरुण ओमानच्या समुद्रात बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या कुटुंबीयांनी कंपनीशी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे समजते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देऊर येथील यश अविनाश देवरे हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये असून ठाणे येथील स्वराज सर्विस प्राइवेट लिमिटेडमध्ये तो ओएस पदावर कार्यरत आहे. तो सौदी अरेबियातील ओमान येथे गेला असताना दि. 28 जानेवारी रोजी त्याचे आणि कुटुंबीयांचे बोलणे झाले होते. मात्र त्यानंतर त्याच्याशी कुटुंबीयांचा कुठलाही संपर्क झालेला नाही.
कंपनीकडून उडवाउडवीची उत्तर
तसेच 29 जानेवारीला दुपारी दोन वाजता संबंधित जहाज कंपनीने देवरे कुटुंबीयांशी संपर्क साधून यश हा चालत्या जहाजातून पाय घसरून पडून समुद्रात बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीने दिली. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी कंपनीशी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच गेल्या काही दिवसांपासून संपर्क क्रमांक देखील बंद करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेंकडे तक्रार
यामुळे गेल्या आठवड्यापासून देवरे कुटुंबीय, नातलग आणि निकटवर्तीय यशच्या शोधात असून एमटी अथेना 1 हे जहाज ओमानहून गुजरातच्या अलंग येथे या आठवड्यात येणार होते. मात्र, हे जहाज किती वाजता येईल याची माहिती यंत्रणेकडून दिली जात नसल्याची तक्रार देवरे कुटुंबियांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील तक्रार दिली आहे.
मुंबईच्या समुद्रात आढळला एकाचा मृतदेह
दरम्यान, बुधवारी (दि. 05) मुंबईच्या समुद्रात मर्चंट नेव्हीच्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला होता. सुनिल पाचार (23) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो दोन दिवसांपासून बेपत्ता होता. 5 फेब्रुवारी रोजी ससून डॉकजवळ स्थानिकांना त्याचा मृतदेह आढळला होता. दोन दिवसांपासून बेपत्ता कर्मचाऱ्याचा मृतदेह बुधवारी रात्री समुद्रात तरंगताना दिसल्याने मोठी खळबळ उडाली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या























