मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाविरोधात विजय वडेट्टीवार मैदानात; संभाजीनगरात सभा...
Vijay Wadettiwar : ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मैदानात उतरले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात मंत्री छगन भुजबळांनंतर (Chhagan Bhujbal) आणखी एका मोठ्या ओबीसी नेत्याने अध्यादेशाला विरोध केला आहे. ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) मैदानात उतरले असून, त्यांच्याकडून 20 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) भव्य सभेचं आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत ट्वीट करत वडेट्टीवार म्हणाले की,"मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढण्याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत झाला नाही. मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या 20 फेब्रुवारीला संभाजीनगर येथे ओबीसींच्या विराट सभेचे आयोजन करण्यात आल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढण्याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत झाला नाही. मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली आहे.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 30, 2024
या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर…
फडणवीसांवर टीका
गृहमंत्री म्हणतात भाजप आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. केंद्रीय मंत्री राणे म्हणतात स्वाभिमानी मराठा समाज कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणतात की, आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील. मग, गृहमंत्री म्हणतात सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाहीत. सरकारचं काय चाललंय ते सरकारमधील मंत्र्यांना तरी कळतंय का? सरकार मुद्दाम ओबीसी विरूद्ध मराठा हा वाद निर्माण करून दोन्ही समाजामध्ये संशयाचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप देखील वडेट्टीवार यांनी केला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर बनवा बनवी
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर घेतलेली शपथ मुख्यमंत्र्यांनी पाळलेली नाही. मराठा समाजाच्या मागण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेली अधिसूचना ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाची फसवणूक आहे. सरकारचा अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर न टिकणारे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फसविण्यासाठी केलेली बनवाबनवी असून दुसरे काही नाही. सर्व पक्षीय बैठकीत आम्हाला विश्वास देण्यात आला होता की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला सरकार धक्का लावणार नाही. मात्र काढण्यात आलेली आधीसूचना म्हणजे ओबीसींच्या आरक्षणावर आक्रमण करण्यासाठी सरकारने टाकलेले पाऊल आहे. निवडणुकीच्या तोंडावर बनवा बनवी करून मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाची फसवणूक करण्याचे पाप मुख्यमंत्री महोदयांनी करू नयेत, असेही वडेट्टीवार म्हणाले.
ओबीसी जनजागृती मोहीमेचा शुभारंभ
मराठा समाजाचा वाढता दबाव लक्षात घेता राष्ट्रीय ओबीसी महासंघ आजपासून ओबीसी जनजागृती मोहीम सुरु करत आहे. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात दिक्षभूमी पासून या ओबीसी जनजागृती मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती वेळ पडल्यास आंदोलनाची पूर्व तयारी म्हणून या जनजागृती मोहिमेकडे पहिले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :