छत्रपती संभाजीनगरमध्ये 'औरंगाबाद'साठी उपोषणाला सुरुवात; खासदार जलील यांची उपस्थिती
Chhatrapati Sambhajinagar: राजकारणासाठी शहराचे नाव बदलण्यात आल्याचा आरोप जलील यांनी यावेळी केला आहे.
Chhatrapati Sambhajinagar: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णय राज्य आणि केंद्र सरकराने घेतला आहे. मात्र आता या निर्णयाला विरोध देखील होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यासह शेकडो नागरिकांनी साखळी उपोषणाला सुरवात झाली आहे. यावेळी 'आय लव औरंगाबाद' नावाचे फलक घेऊन अनेकजण या उपोषणात सहभागी झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान राजकारणासाठी शहराचे नाव बदलण्यात आल्याचा आरोप जलील यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान साडेबारा वाजेच्या सुमारास जलील हे उपोषणास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासह एमआयएमचे अनेक पदाधिकारी देखील याठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. सोबतच अनेक वेगवेगळ्या राजकीय संघटनांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर या साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वरिष्ठ अधिकारी देखील उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे समोर आले आहे. तर हे साखळी उपोषण कधीपर्यंत येईल, याबाबत सांगता येणार नसल्याचं जलील म्हणाले आहे.
हुकुमशाही चालणार नाही...
दरम्यान यावेळी बोलताना जलील म्हणाले की, "उपोषणाची सुरुवात झाली असून, पाहा आणखी किती दिवस सुरु असणार आहे. उपोषणासाठी आलेले सर्व सर्वसामान्य औरंगाबादकर आहेत. तर औरंगाबादचे नाव हे औरंगाबादच ठेवायला पाहिजे अशी, त्यांची भावना आहे. आता आम्ही कोणत्याही प्रकारे राजकारण करत नाही. हे माझं शहर असून, त्यासोबत आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. तर आमच्या शहराचे नाव दिल्ली आणि मुंबईत बसून बदलू शकत नाही हे आम्हाला सरकारला सांगायचे आहे. देशात लोकशाही असून, तुमची हुकुमशाही चालणार नाही. त्यामुळे आम्हाला नामांतराचा निर्णय मान्य नाही."
'आय लव औरंगाबाद'चे फलक
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर आज नामांतराच्या निर्णयाच्या विरोधात साखळी उपोषण करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांनी उपोषणास्थळी हजेरी लावली. तर यावेळी तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. तर अनेकांनी हातात 'आय लव औरंगाबाद'चे फलक सोबत आणले होते. तर काहींनी 'आय लव औरंगाबाद'चे टी शर्ट घातले होते. तसेच शहराचे नाव पुन्हा औरंगाबादच कायम ठेवण्याची मागणी यावेळी उपोषणकर्त्यांनी केली. तर यावेळी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला.
इतर महत्वाच्या बातम्या:
राजकारण तापलं! नामांतरावरुन एमआयएमचं उपोषण तर मनसेकडून 'स्वाक्षरी मोहीम'