राजकारण तापलं! नामांतरावरुन एमआयएमचं उपोषण तर मनसेकडून 'स्वाक्षरी मोहीम'
City Name Changed News: आगामी काळात नामांतराच्या मुद्यावरून राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
City Name Changed News : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव (Dharashiv) करण्यात आले आहे. मात्र याच निर्णयावरुन आता जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. नामांतराच्या निर्णयाचे कुठे समर्थन होत आहे तर कुठे विरोध करण्यात येत आहे. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiyaz Jaleel) यांनी या निर्णयाला विरोध करत, आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर बेमुदत उपोषणाला (MIM Protest) बसण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मनसेकडून (MNS) आज शहरात नामांतराच्या समर्थनात स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात नामांतराच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
मनसेकडून स्वाक्षरी मोहीम!
नामांतराच्या निर्णयाला एमआयएमने विरोध केल्यावर मनसेकडून जलील यांच्यावर टीका करण्यात आली होती. तर नामांतराच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी जलील रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असतील, तर आम्ही देखील आंदोलन करुन उत्तर देऊ असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिला होता. दरम्यान जलील यांनी उपोषणाची घोषणा करताच मनसेकडून देखील स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज सकाळी 11.30 वाजता शहरातील टीव्ही सेंटर भागातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात स्वाक्षरी मोहीमेला सुरुवात करण्यात येणार आहे. तर यावेळी नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.
आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण!
औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला केंद्र आणि राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात आजपासून एमआयएम रस्त्यावर उतरणार असून, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी तीन वाजेपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे. यावेळी उपोषणाला खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे अनेक नेते देखील उपस्थित राहणार आहेत. तर औरंगाबाद नामांतर कृती विरोधी समितीच्या अंतर्गत हे उपोषण केले जाणार आहे. तर आजपासून सुरु होणारे हे उपोषण कधीपर्यंत सुरु राहिल, याबाबत सांगता येणार नसल्याची माहिती जलील यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली आहे.
पोलिसांनी जाणून घेतली उपोषणाची माहिती
दरम्यान आज एमआयएमकडून नामांतराच्या विरोधात उपोषण केले जाणार असल्याने, पोलिसांनी याची दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जलील यांच्याची चर्चा करत उपोषणाबाबत आढावा घेतला आहे. सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी जलील यांच्यासोबत चर्चा करत उपोषण कसे असणार, किती लोक येण्याची शक्यता आहे, याबाबत माहिती जाणून घेतली आहे. तर या उपोषणाच्या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त असण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Imtiyaz Jaleel: नामांतरावरुन राजकारण तापलं; आजपासून खासदार इम्तियाज जलील बेमुदत उपोषणावर