Satish Kaushik Net Worth : सतीश कौशिक यांनी पत्नी आणि मुलीसाठी सोडली कोट्यवधींची संपत्ती; जाणून घ्या 'कॅलेंडर'चं नेट वर्थ...
Satish kaushik : अभिनेते सतीश कौशिक पटकथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
Satish Kaushik : प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनिल कपूरच्या 'मिस्टर इंडिया' (Mister India) या सिनेमातील 'कॅलेंडर' या भूमिकेमुळे ते घराघरांत पोहोचले. अभिनेते, पटकथा लेखक आणि निर्माते म्हणून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सतीश कौशिक यांनी आपल्या मागे कोट्यवधींची संपत्ती सोडली आहे.
सतीश कौशिक यांचा मायानगरीपर्यंतचा प्रवास...
सतीश कौशिक यांचं बालपण हरियाणा आणि दिल्लीत गेलं आहे. 1972 साली किरोडीमल महाविद्यालयात त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. त्यावेळी अभिनयाची आवड लागल्याने पुढील शिक्षणासाठी त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. अभिनयाचं शिक्षण घेतल्यानंतर मायानगरी असलेल्या मुंबईचा रस्ता त्यांनी पकडला. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी 'मिस्टर इंडिया' या सिनेमाच्या माध्यमातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेता, पटकथा लेखक आणि निर्माता म्हणून हिंदी सिनेसृष्टीत काम करण्यासोबत त्यांनी अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं.
सतीश कौशिक यांच्या संपत्तीबद्दल जाणून घ्या...
सतीश कौशिक यांनी 35 वर्षांहून अधिक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. शेखर कपूरच्या 'मासूम' या सिनेमाच्या माध्यमातून सतीश कौशिक यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, सतीश कौशिक यांनी आपल्या मागे 120 कोटींची संपत्ती सोडली आहे. सतीश कौशिक यांनी 100 पेक्षा अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'राम-लखन' आणि 'साजन चले ससुराल' या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट विनोदवीराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
आलिशान घर ते महागड्या गाड्या
अभिनय, लेखन, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून सतीश कौशिक यांनी चांगलीच कमाई केली आहे. मालिकांमध्ये काम करण्यासह छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची धुरादेखील त्यांनी सांभाळली आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारे सतीश कौशिक यांचे मुंबईत एक आलिशान घर आहे. तसेच त्यांच्याकडे 'ऑडी Q7', 'ऑडी Q 3' या महागड्या गाड्यादेखील आहेत.
सतिश कौशिक यांचा सिनेप्रवास...
सतिश कौशिक यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. 'जाने भी दो यारों', 'राम-लखन', 'बडे मियां छोटे मियां', 'मिस्टर इंडिया', 'दीवाना मस्ताना', 'हसीना मान जाएगी', 'भारत', 'छलांग' आणि 'उडता पंजाब' या सिनेमांचा यात समावेश आहे. तसेच 'हम आपके दिल में रहते है', 'हमारा दिल आपके पास है', 'बधाई हो बधाई', 'तेरे नाम' आणि 'मुझे कुछ कहना है' सारख्या लोकप्रिय सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.
संबंधित बातम्या