चंद्रपुरात भाजप नगरसेविकेची सामाजिक कार्यकर्त्याच्या घरी तोडफोड
आरटीआय कार्यकर्ते बेले यांनी स्थानिक नगरसेविका छबुताई वैरागडे यांच्याविरोधात अनाधिकृत बांधकाम केल्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या होत्या व त्यावरून या दोघांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू होता.

चंद्रपूर : चंद्रपुरात भाजप नगरसेविकेने सामाजिक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. तसेच बाहेर उभ्या असलेल्या दुचाकी गाडीवरही दगड मारला. जटपुरा प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका छबू वैरागडे यांनी कुटुंबासह राजेश बेले यांच्या घरावर हल्ला केला.
चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ते व आरटीआय तक्रारींच्या निमित्ताने सतत वादात राहणारे राजेश बेले यांच्या घरी आज भाजप नगरसेविकेने गोंधळ घालून तोडफोड केली. भाजप नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी आपल्या कुटुंबासह बेले यांचे घर गाठत तोडफोड करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे जटपुरा गेट परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
गेले काही दिवस आरटीआय कार्यकर्ते बेले यांनी स्थानिक नगरसेविका छबुताई वैरागडे यांच्याविरोधात अनाधिकृत बांधकाम केल्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या होत्या व त्यावरून या दोघांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू होता. त्याचे पर्यवसान आज थेट हल्ला व तोडफोडीत झाले. दरम्यान सततची बदनामी व अधिकाऱ्यांकडे होत असलेली वेगवेगळ्या कामांची नाहक तक्रार यामुळेच संतापून जात आपण हे पाऊल उचलल्याचे नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी म्हटले आहे सोबतच आरटीआय कार्यकर्ते बेले यांनी याच प्रकारातून आपल्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रारही वैरागडे यांनी केली आहे.
तर दुसरीकडे राजेश बेले यांनी आपण विविध अनधिकृत व बेकायदा प्रकरणात आवाज उचलल्याने वैरागडे यांनी संतप्त होत आपल्यावर कुटुंबियांसह चाकू हल्ला केला असं म्हटलं आहे. दरम्यान दोन्ही पक्षांनी रामनगर पोलीस ठाणे गाठत परस्परांविरोधात तक्रार नोंदविली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
