Ajit Pawar : अजितदादा अजून 20- 25 वर्षांनी मुख्यमंत्री बनतील, भाजपच्या 'या' मंत्र्यांची मिश्किल टिप्पणी
Maharashtra Politics : नांदेडच्या रुग्ण मृत्यूचा उच्चस्तरीय अहवाल अहवाल आला आहे, दोषींवर कारवाई करणार असल्याचं भाजपच्या मंत्र्यांनी सांगितलं.
भंडारा : अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे मुख्यमंत्री होतील असा दावा सातत्याने त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. त्यासाठी राज्यातील सध्याच्या घडणाऱ्या घडामोडींचाही दाखला दिला जातोय. मात्र अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर भाजपच्या एका मंत्र्यांना वक्तव्य करत त्याचील हवाच काढून घेतल्याचं समोर आलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं राहणार आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं आहे, अजितदादा अजून 20-25 वर्षांनी मुख्यमंत्री होतील अशी मिश्किल टिप्पणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी केली आहे.
भाजप काँग्रेसमुक्त राज्य करण्याचं स्वप्न बघत असून अजित पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री बनवणार असल्यास भाजपचं स्वागत करतो अशी कोपरखळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मारली होती. त्यावर राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अतुल सावे म्हणाले की, "अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार याबाबत क्लिअर केलं नाही. त्यांना मुख्यमंत्री कधी करतील हे काही लिहिलं नाही. भविष्यात ते मुख्यमंत्री होऊ शकतात. भविष्य कधीही असू शकते, 10 वर्षात, 20 वर्षात, 25 वर्षानी"
नांदेड रुग्ण मृत्यू प्रकरणी दोषींवर नक्कीच कारवाई करणार
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नांदेड रुग्ण मृत्यू प्रकरणी राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना अतुल सावे म्हणाले की, "नांदेड येथील रुग्णालयातील रुग्ण तपासणी उच्चस्तरीय अहवाल आलेला आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा नव्हता. छत्रपती संभाजीनगर रूग्णालयातील घाटे रुग्णालयाचा पाच वर्ष रुग्ण कल्याण समितीचा अध्यक्ष होतो. त्याही वेळेस दिवसाला सरासरी 8 ते 10 रुग्ण दगावत होते. काही वेळेस रुग्णांचा आजार सिरियस झालेला असतो, त्यामुळं त्यांच्यावर उपचार करण्याची स्थिती नसते. तशीच परिस्थिती नांदेडला झाली असावी. याची सखोल चौकशी केली जाईल आणि यात जे दोषी असेल त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल."
बच्चू कडू यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू
आमदार बच्चू कडू हे आमचे सहयोगी सदस्य आहेत. सहयोगी सदस्यांमध्ये ते अपक्ष असल्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या भावना आम्ही नक्कीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू आणि त्यावर काय निर्णय घेता येईल ते पाहू असं अतुल सावे म्हणाले, बच्चू कडू यांनी केलेल्या भाजपवर केलेली टीकेवर ते बोलत होते.
ही बातमी वाचा: