Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
Tata Bike Viral News : टाटा कंपनीने हायब्रिड बाईक बाजारात आणली असून त्याची किंमत फक्त 18 हजार रुपये असल्याची बातमी व्हायरल होत आहे.

मुंबई : टाटा म्हणजे विश्वास, मजबुती आणि सुरक्षितता असं जणू सूत्रच आहे. टाटा कंपनीने अगदी कोट्यवधी किमतीच्या गाड्यांपासून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नॅनोपर्यंत अनेक प्रयोग केले आहेत. ते वेळोवेळी लोकांच्या पसंतीसही उतरले आहेत. अशात आता टाटा कंपनीसंबंधी एक बातमी व्हायरल (Tata Bike Viral News) होत आहे. टाटाने त्याची नवी हायब्रिड बाईक (Tata Hybrid Bike) बाजारात आणली असून त्याची किंमत फक्त 18,000 इतकी असल्याची बातमी आतापर्यंत अनेकांनी वाचली असेल. जाणून घेऊया त्या बातमीमागचं नेमकं सत्य काय...
Tata Bike Viral News : व्हायरल बातमी काय?
टाटा कंपनीने टाटा नॅनो प्रमाणे टू व्हिलर मार्केटमध्येही एक नवा प्रयोग केला आहे. कंपनीने एक नवी हायब्रिड बाईक बनवली असून ती सर्वसामान्यांना परवडेल अशी आहे. 125 सीसी क्षमता असलेली टाटाची नवी बाईक ही फक्त 18 हजारांना मिळणार अशी माहिती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या बाईकचे फोटोही व्हायरल होत असून त्यामध्ये ती बाईक अधिक आकर्षक आणि मजबूत असल्याचं दिसतंय.
Tata Hybrid Bike Price : व्हायरल बातमीमागचं सत्य काय?
सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं समोर आलं आहे. टाटा कंपनीनेही तसं काहीच नसल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. टाटा कंपनीचा टू व्हिलर मार्केटमध्ये येण्याचा कोणताही मानस नाही. या संबंधित बातम्या खोट्या आहेत असं टाटा कंपनीने स्पष्ट केलं.
Dear Ashim, thank you for reaching out. Tata Motors is not entering the two-wheeler segment, Any news or information that you may come across suggesting this is inaccurate. For factual news and official updates, please visit https://t.co/xGpcn9vPzi for Passenger Vehicles news and…
— Tata Motors (@TataMotors) November 5, 2025

















