Bhandara Gang Rape Case : भंडाऱ्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणी 3 पोलिसांचं निलंबन, रुपाली चाकणकरांची माहिती
Bhandara Gang Rape Case : भंडाऱ्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणी तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
Bhandara Gang Rape Case : भंडाऱ्यातील (Bhandara) सामुहिक बलात्कार प्रकरणी तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. पहिल्यांदा अत्याचार घडल्यानंतर महिला पोलीस स्थानकात गेली होती. पण त्यावेळी पोलिसांनी याप्रकरणाकडे दुर्लक्ष केलं, म्हणूनच दुसरी घटना घडली. महिला पोलीस स्थानकातून बाहेर पडतानाचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेलं आहे. त्यामुळे पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
रुपाली चाकणकर बोलताना म्हणाल्या की, "भंडारा-गोंदियातील सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची आज भेट घेतली. एक शस्त्रक्रिया झाली असून आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. आज पीडितेची प्रकृती स्थिर आहे. मी स्वतः आज तिच्याशी संवाद साधला. जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. यामध्ये तीन मुख्य आरोपी आहे. त्यातील दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून एक अद्याप फरार आहे. पीडिता बोलण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळं तिच्याकडून फारशी माहिती घेण्यात आली नाही. पण आता तिची प्रकृती स्थिर असल्यामुळे आज काही माहिती ती देईल, अशी खात्री वाटते."
"सदर प्रकरणात मनधैर्य योजनेच्या माध्यमातून आपण पीडितेला जी मदत देतोय. पहिल्यांदा अत्याचार घडल्यानंतर महिला पोलीस स्थानकात गेली होती. पण त्यावेळी पोलिसांनी याप्रकरणाकडे दुर्लक्ष केलं, म्हणूनच दुसरी घटना घडली. महिला पोलीस स्थानकातून बाहेर पडतानाचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेलं आहे. त्यामुळे तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे.", असंही त्यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ : भंडाऱ्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणी 3 पोलिसांचं निलंबन : रुपाली चाकणकर
पीडितेबाबत पोलिसांची असंवेदनशीलता?
भंडाऱ्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेवर दुसऱ्यांदा झालेला बलात्कार हा पोलिसांच्या बेफिकीरीनं झाल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. पीडित महिलेवर गोरेगावच्या जंगलात बलात्कार झाला. दुसऱ्या दिवशी मुरमाळी गावाजवळ फिरणाऱ्या या महिलेची तिथल्या पोलीस पाटील महिलेनं विचारपूस केली. या पोलीस पाटील महिलेनं तिला लाखनी पोलीस ठाण्यात पाठवलं. तिथे तिला वैद्यकीय मदत देण्याऐवजी आधी तिची चौकशी केली. त्यानंतर ती महिला पोलीस ठाण्यातून बाहेर पडली आणि धर्मा ढाब्यावर गेली. तिथे दोघांनी तिच्यावर पुन्हा बलात्कार केल्याची घटना घडली.
पोलिसांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळेच महिलेवर पुन्हा अत्याचार झाल्याचं प्राथमिक तपासात उघडकीस आलं आहे. तसेच, पीडिता 31 जुलैला लाखनी पोलीस ठाण्यात आली असतानाच पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि जर ती पोलीस ठाण्यात पोहोचली होती, तर तिच्यावर तिथून पळून जाण्याची वेळ का आली? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत.
पोलिसांचं म्हणणं काय?
नागपूरचे प्रभारी आयजी संदीप पाटील यांनी या संदर्भात लाखनी पोलीस ठाण्यात येत चौकशी केली. मात्र अद्यापही दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही झाली. तर पीडिता ही गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यातील राहणार असल्यानं आणि पहिल्यांदा झालेला अत्याचार हा गोरेगाव पोलिसांच्या हद्दीत झाल्यानं हा तपास आता गोंदियाच्या गोरेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गोरेगावातील मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तर लाखनी पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणा संदर्भात भांडाऱ्याचे पोलीस अधिक्षक लोहित मसानी यांना विचारणा केली आहे. पीडिता ही पोलीस ठाण्यात आली होती, त्यावेळी तिचे कपडे देखील व्यवस्थित होते. मात्र तिला विचारपूस केल्यावर ती काहीही सांगत नव्हती, त्यामुळे तिला पोलीस ठाण्यात आसलेल्या महिला सुरक्षा कक्षात महिला पोलिशस शिपयांसोबत बसवून ठेवलं. मात्र पहाटेच्या सुमार महिला पोलीस ठाण्यातून पळून गेली, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली.