Rahul Narwekar: मंत्रिपदाची इच्छा अधुरीच राहिली, राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी, मुंबईतून आशिष शेलारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता
Maharashtra Vidhan Sabha Speaker: राहुल नार्वेकर रविवारी दुपारी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करतील. आशिष शेलारांना मोठी संधी मिळण्याची शक्यता.
मुंबई: राज्यातील 288 नव्या आमदारांच्या शपथविधीसाठी सध्या विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु आहे. काल तब्बल 170 आमदारांना हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर रविवारी उर्वरित आमदारांचा शपथिधी पार पडेल. यानंतर सोमवारी नवनिर्वाचित आमदार विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडतील. विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजपच्या राहुल नार्वेकर यांचीच वर्णी लागणार, हे जवळपास निश्चित आहे. महायुतीकडे असलेल्या प्रचंड संख्याबळामुळे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरील निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे. ते रविवारी दुपारी 12 वाजता अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करतील. महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदावर दावा सांगितला जाण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे सोमवारी राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होतील. राहुल नार्वेकर हे यंदा मंत्रिपदासाठी इच्छूक होते. मात्र, त्यांची ही इच्छा अधुरीच राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
विधानसभा अध्यक्षपद हे शक्यतो एखाद्या ज्येष्ठ नेत्याला दिले जाते. राजकारणात उतरता काळ दिला की अशा पदांवर नेत्यांची वर्णी लावली जाते, असा एक सर्वसाधारण राजकीय समज आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर हे यंदा मंत्रिपदासाठी इच्छूक होते. त्यांच्यासोबत मुंबईतून आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा हे नेतेही मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. त्यामुळे मंत्रिपदाची संधी कोणाला मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, राहुल नार्वेकर यांनी वकिलीचे शिक्षण घेतल्यामुळे त्यांना कायद्याची जाण आहे. त्यामुळे नियमांवर बोट ठेवून काम कराव्या लागणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदासाठी साहजिकच राहुल नार्वेकर यांच्याकडेच भाजप नेतृत्त्वाचा कल आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरुन झालेल्या वादावेळी राहुल नार्वेकर यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळली होती. याशिवाय राहुल नार्वेकर यांचा एकूण कल आणि प्रतिमा ही प्रशासकीय कामकाजासाठी अधिक योग्य असल्याचे सांगितले जाते. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन भाजप नेतृत्त्वाकडून राहुल नार्वेकर यांनाच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी बसवले जाईल.
आशिष शेलारांना मंत्रिपद मिळणार का?
महायुती सरकारमध्ये भाजपला 23 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबईतून भाजप कोणत्या नेत्यांना संधी देणार, हे पाहावे लागेल. मुंबईतून आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांचे नाव आघाडीवर आहे. मंगलप्रभात लोढा हे यापूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, आशिष शेलार यांना 2019 मधील काही महिने वगळता मंत्रिपद मिळालेले नाही. आशिष शेलारांना मुंबई अध्यक्षपदावरच समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यावेळी आशिष शेलार यांना मंत्रीपद मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
आणखी वाचा