Beed: बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीप्रकरणी चौकशी होणार, प्रशासनाची मोठी ॲक्शन
औषध पुरवल्याप्रकरणी पाठवपुराव्याच्या एबीपी माझाच्या बातमीनंतर रुग्णालय प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Beed:राज्यात बनावट औषध पुरवठाप्रकरणी अंबेजोगाई, नागापूर, वर्धा, भिवंडी अशा राज्यात शासकीय दवाखान्यांमध्येच बनावट औषध पुरवठ्यांची बोगसगिरी समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अंबेजोगाईत शासकीय हॉस्पिटललाच बनावट औषध पुरवल्याप्रकरणी पाठवपुराव्याच्या एबीपी माझाच्या बातमीनंतर रुग्णालय प्रशासनाकडून याप्रकरणी चौकशीसाठी द्विसदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे.अंबाजोगाईतील शासकीय स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाला बनावट औषध पुरवठा प्रकरणी द्विसदस्य चौकशी समिती स्थापना करण्यात आली असून याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. बीडच्या अंबाजोगाईतील बनावट औषध पुरवठा प्रकरणी स्वराती रुग्णालयाकडून द्विसदस्य चौकशी समिती स्थापन करण्यात आलीय. यातील विशाल एंटरप्राइजेस एजन्सीचे बिले थांबवण्यात आले असून एजन्सी ब्लॅक लिस्ट करण्यात आली आहे.
अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेल्या अजिथ्रोमाइसिन गोळ्यांचे नमुने गतवर्षी औषध विभागाने तपासणीसाठी घेतले होते. याचा अहवाल वर्षभरानंतर प्राप्त झाला. यात ही गोळी अप्रमानीत असल्याचं समोर आलं. कोल्हापूरच्या विशाल एंटरप्राइजेस एजन्सीकडून जवळपास 25 हजार गोळ्यांचा पुरवठा 29 जुलै 2023 रोजी रुग्णालयाला झाला होता. मात्र तपासाअंती या गोळ्या अप्रमणित असल्याचं उघड झाल्यानंतर खळबळ उडाली. रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार दिसून आला. दरम्यान या प्रकरणात औषध निरीक्षक मनोज पैठणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर, स्वराती रुग्णालयाकडून द्विसदस्य चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
शासकीय रुग्णालयातच बनावट औषधांचा पुरवठा,
बीडच्या अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानेच बनावट औषधाचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे. याप्रकरणी सुरत आणि ठाणे या ठिकाणच्या चौघांवर गुन्हा दाखल झालाय. ही बनावट औषध निर्मिती आणि विक्री प्रकरणात आंतरराज्य टोळी असल्याची शक्यता वर्तवली जात असून राज्यात त्यांचे जाळे पसरले असण्याची शक्यता फिर्यादीने व्यक्त केली आहे. अशातच आता बीड पाठोपाठ वर्धा आणि भिवंडीमध्ये सुद्धा कंत्राटदाराने बनावट औषधाचा पुरवठा केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे
आंतरराज्य टोळीचा यात समावेश असण्याची शंका
स्वाराती रुग्णालयातील अॅझिमसिम 500 या गोळीचे नमुने, 10 ऑगस्ट 2023 रोजी तत्कालीन औषध निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी तपासणीसाठी घेतले होते. मुंबईच्या प्रयोगशाळेकडून याचा तपासणी अहवाल एक वर्षानंतर, 18 ऑक्टोबर 2024 रोजी मिळाला. ई-टेंडरिंगद्वारे 25 हजार 900 गोळ्यांचा पुरवठा कोल्हापूरच्या विशाल एंटरप्रायजेसने, 29 जुलै 2023 रोजी केला होता. आता हा पुरवठा स्वराती रुग्णालयात शिल्लक नसून ही कंपनीच अस्तित्वात नसल्याचं तपासात उघड झालं आहे.