विधीमंडळ कामकाजाची आज बैठक, नागपूर अधिवेशनाचा मुहुर्त ठरणार,कामकाज काय राहणार?
Maharashtra legislative session meeting: या दोन दिवसांच्या अधिवेशनानंतर नागपुरात 16 -21 डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन होणार आहे.
Maharashtra legislative session meeting: राज्यात हिवाळी अधिवेशनाच्या तारखा आल्या असल्या तरी त्याआधी राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच इतर मंत्रिमंडळाची विधीमंडळ कामकाजाची बैठक आज मुंबईत पार पडणार आहे. या दोन दिवसांच्या अधिवेशनानंतर नागपुरात 16 -21 डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन होणार आहे. विधीमंडळ कामकाजाच्या बैठकीत विधानसभेसाठी काय कामकाज ठेवता येईल? यावरही आज चर्चा करण्यात येणार आहे.दरम्यान, विरोधक कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सामील होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राज्यात हिवाळी अधिवेशनाची तयारी सत्तास्थापनेच्या आधीपासूनच नागपुरात सुरु होती. यंदा आमदारांची खातीरदारी डिजिटल होणार असून फायलींचा भार कमी होणार आहे. पेपरलेस होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्तही आजच्या विधीमंडळ बैठकीत ठरेल. तसेच नागपुर अधिवेशनाचीही तारिख आजच कळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
आमदारांची डिजिटल खातिरदारी
नवीन महायुती सरकारचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन असणार आहे.सरकार स्थापन झाल्यानंतर ऐनवेळी तयारी करणं शक्य नसल्यानं आता नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला गती आली आहे.या हिवाळी अधिवेशनात विशेष म्हणजे आमदारांना फायलींचं ओझं कमी होणार आहे. विधानसभा सभागृहात आमदारांच्या आसनासमोर सभागृहाच्या दैनंदिन कामकाजासह इतर माहिती देणारी डिजीटल स्क्रीन बसवण्यात येत आहे.ज्यामुळे आमदारांना सभागृहाच्या कामात सहभागी होताना सर्व माहिती एका क्लिकवर मिळवता येणार आहे.विधानपरिषद च्या आमदारांसाठी डिजिटल आसन व्यवस्था असणार आहे.
हिवाळी अधिवेशन कमी दिवसांचे
हिवाळी अधिवेशनात यंदा प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यानं अधिवेशन कमी दिवसांचं राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हिवाळी अधिवेशनात प्रामुख्याने विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांना विविध विषयांवर प्रश्न विचारून संबधित खात्याच्या मंत्र्यांना उत्तर देण्यास भाग पडतात. यंदा प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्याने विरोधीपक्ष नेतेही नसणार आहेत.