(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange: मनोज जरांगेच्या अडचणी वाढणार? 3 गुन्ह्यांच्या तपासासाठी गेवराई पोलिसांची नोटीस, नेमकं काय आहे प्रकरण?
Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना 3 गुन्ह्यांसंदर्भात बीडच्या गेवराई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. नेमकं काय आहे प्रकरण ते जाणून घ्या सविस्तर
Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांना 3 गुन्ह्यांसंदर्भात बीडच्या गेवराई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. जानेवारी 2024 मध्ये जरांगे पाटलांवर (Manoj Jarange Patil) गेवराई पोलीस ठाण्यात हे गुन्हे नोंद होते. दरम्यान, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांचे गुन्हे शासन मागे घेणार आहे. त्यासाठी 31ऑगस्टपर्यंत या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर होणे आवश्यक आहे. त्यामुळे तपासाचा भाग म्हणून ही नोटीस दिली गेल्याची माहिती गेवराई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. त्यांच्या अनेक सभा रात्री उशीरा, मध्यरात्री झाल्या तर काही ठिकाणी त्यांच्या आवाहनावरुन रास्ता रोको आंदोलन झाल्याने, जरांगे पाटलांवर गुन्हे नोंद करण्यात आले होते. गेवराई तालुक्यात धोंडराई येथील सभा, गेवराईतील सभा आणि मुंबईला जाताना मादळमोही येथील सभा यामुळे त्यांच्यावर 3 गुन्हे नोंद होते.
मनोज जरांगेंवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल
काही दिवसांपुर्वी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी राज्यातील अनेक भागामध्ये दौरे केले होते, सभा घेतल्या होत्या. या सभा घेत असताना अनेकदा रात्री उशिरा सभा घेतल्याबाबत, जेसीबीच्या माध्यमातून फुल उधळून स्वागत केलं आलं. तर स्वागतासाठी मोठी गर्दी देखील जमवण्यात आली होती. धोकादायक पद्धतीने जेसीबीचा वापर केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जरांगेंचे आरोप, फडणवीसांचे उत्तर
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या निशाण्यावर सुरुवातीपासून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राहिले आहेत. मराठा आरक्षणात फडणवीसांनी आडकाठी आणली या आरोपांचा त्यांनी पुन्हा पुनरुच्चार केला. त्यावर फडणवीसांनी आज मात्र शेवटी निर्वाणीचं उत्तर दिलं. मराठा आरक्षणाबाबत एकाही निर्णयात मी आडकाठी आणली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर पदाचा राजीनामा देऊन राजकारण सोडेन, अशी तयारीच देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दाखवली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही त्यावर स्पष्टीकरण दिलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भूमिका महत्त्वाची राहिलीय अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shnde) यांनी तात्काळ दिली.