Narayangad Beed: बीडच्या नारायणगडावर सत्तेची रस्सीखेच, महंतांनी उत्तराधिकारी घोषित केला पण भाविकांचा खळबळजनक आरोप, बैठकीत नेमकं काय घडलं?
Narayangad Beed : बीडच्या नारायण गडावरील उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळातील वाद चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर भाविक आणि ग्रामस्थांची महत्त्वाची बैठक पार पडली.

Narayangad Beed : बीडमधील श्रीक्षेत्र नारायण गडावरील महंत शिवाजी महाराज यांनी घोषित केलेले उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळातील सदस्यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारातून नारायणगडाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. या वादामुळे नारायणगड राज्यभरात चर्चेत आला असून याची खंत स्वतः महंत शिवाजी महाराजांनी बोलून दाखवली होती. दरम्यान, याच अनुषंगाने भाविक आणि परिसरातील ग्रामस्थांनी बैठक घेतली आहे.
नारायण गडावरील महंत शिवाजी महाराज यांनी संभाजी महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली आहे. ग्रामस्थांनी घेतलेल्या बैठकीत महंतांनी घोषित केलेल्या उत्तराधिकाऱ्याला एकमुखी संमती दर्शविण्यात आली. महंतांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. ज्यांना कोणाला या निर्णयाला विरोध असेल त्यांनी गडाच्या विश्वस्त मंडळातून बाहेर पडावं, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
विश्वस्त मंडळावर भाविकांचा खळबळजनक आरोप
तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावर दसरा मेळावा घेतला आणि गडाला राजकीय किनार दिसून आली. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी नव्याने दसरा मेळावा घेतला नाही. तर ती परंपरा कायम ठेवली. या दसरा मेळाव्याला कुणाची तरी दृष्ट लागली. नारायणगडाचा वाद चव्हाट्यावर यायला नको होता. हा वाद बसून मिटवला पाहिजे होता, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. नारायण गड श्रद्धेचे ठिकाण आहे. राजकीय आखाडा नाही. विश्वस्त मंडळातील काही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यापासून महंतांच्या जीविताला धोका आहे. पैशांमुळे महंतांचा घात होऊ शकतो, असा थेट आरोप देखील या बैठकीत करण्यात आला आहे.
बीड मधील नारायण गडाचे महत्त्व
नारायणगड हे एक पवित्र धार्मिक स्थळ असून, येथे दर बारा वर्षांनी एका शिवलिंगाची निर्मिती होते, अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे. या गडावर अनेक संत-महंतांनी श्री शंभू महादेवाची तपश्चर्या केली आहे. नारायण महाराजांनी सुमारे तीनशे वर्षांपूर्वी येथे कठोर तप करून महादेवाला प्रसन्न केल्याची आख्यायिका सांगितली जाते. जिल्ह्यातील अनेक धार्मिक गडांपैकी नारायणगड हा एक अत्यंत महत्त्वाचा गड म्हणून ओळखला जातो.
सध्याचे शिवाजी महाराज हे नारायणगडाचे नववे महंत (मठाधिपती) आहेत. त्यांनी संभाजी महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली आहे. येथे गुरु-शिष्य परंपरेनुसारच उत्तराधिकारी नियुक्त केले जातात, आणि या निवडीचे संपूर्ण अधिकार हे महंतांकडेच असतात.
गतवर्षी, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावर पहिल्या दसरा मेळाव्याचे आयोजन केले. या घटनेनंतर गडाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आणि चर्चा सुरू झाली. अलीकडे महंत शिवाजी महाराजांनी नियुक्त केलेल्या उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळातील काही सदस्यांवरील आरोपांमुळे नारायणगड पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
आणखी वाचा
























