MPSC परीक्षेत बीडची सोनाली मात्रे महिला प्रवर्गातून राज्यात पहिली, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शेतकरी कन्येचं जबरदस्त यश
MPSC Success Story: एमपीएससीने गुणवत्ता यादी जाहीर केली असून त्यामध्ये बीडच्या सोनाली मात्रेने महिला प्रवर्गातून पहिली येण्याचा मान पटकावला आहे.
बीड: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) नुकतीच गुणवत्ता यादी जाहीर केली असून त्यामध्ये बीड जिल्ह्यातील माजलगावच्या सोनाली अर्जुन मात्रे हिने बाजी मारली आहे. सोनालीने सर्वसाधारण यादीत तिसरी तर राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. सोनालीच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शेतकऱ्याची कन्या आज राज्यात प्रथम आली आणि ही अभिमानाची गोष्ट असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.
सन 2021 साली जाहीर झालेल्या राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. यामध्ये माजलगावची सोनाली मात्रे ही महिलांमधून प्रथम आली आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या मुलीनं हे यश प्राप्त केलं असून आपल्याला त्याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया सोनालीच्या वडिलांनी, अर्जुन मात्रे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 405 पदांसाठी 7, 8 आणि 9 मे 2022 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सांगलीचा प्रमोद चौघुले याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर शुभम पाटीलने दुसरा क्रमांक पटकावला. सोनाली मात्रे तिसरी आली असून महिला प्रवर्गात ती राज्यात पहिली आली.
सोनाली ही माजलगाव तालुक्यातील ईरला मजरा येथील रहिवाशी असून शेतकरी अर्जुन मात्रे यांची कन्या आहे. सोनालीच्या रूपाने राज्यात MPSC परीक्षेत प्रथम येण्याचा मान आता या गावाला मिळाला आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार यासह एकूण 20 पदांच्या 405 जागांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेब लिंक उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
उमेदवारांकडून विहित पध्दतीने प्राप्त पसंतीक्रमाच्या आधारे अंतिम निकाल पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल
1- वेबलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व 20 संवर्गाकरीता 1 ते 20 मधील पसंतीक्रम अथवा No Preference' विकल्प निवडणे अनिवार्य आहे.
2- अधिसूचित सर्व संवर्गाकरिता 1 ते 20 मधील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार निवडीकरीता विचार होईल.
3- अधिसूचित 20 संवर्गापैकी / पदांपैकी ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक आहे; केवळ त्याच पदाकरिता पसंतीक्रम सादर करावेत. ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक नाही. त्या पदांकरीता 'No Preference' हा विकल्प
निवडावा.
4- संवर्गाचे पसंतीक्रम सादर केल्यानंतर 'Download PDF' हा पर्याय निवडून उमेदवारास सादर केलेले पसंतीक्रम जतन करून ठेवता येऊ शकतील.
5- पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या संवर्ग / पदांकरीता पसंतीक्रम सादर करतील केवळ त्याच संवर्ग/पदांवरील निवडीकरीता त्यांचा विचार करण्यात येईल.
6- विहित कालावधीनंतर संवर्ग/ पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची अथवा बदलण्याची उमेदवाराची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.
ही बातमी वाचा: