मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
नोटीस बजावून आणि सूचना देऊन सुद्धा रेस्टॉरंट आणि ढाबा मालकांनी पालन न केल्यास परवाना रद्द करणे, दंड आणि कायदेशीर कारवाईसह कठोर कारवाई केली जाईल.

मुंबई : हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलं की तंदुर रोटी ऑर्डर करणे म्हणजे नित्यनियमाचं बनलं आहे. पंजाबी तंदुर रोटी हा सर्रास खवय्यांचा आवडता पदार्थ बनला आहे. भाकरी, रोटी, चपाती, तांदुळाची भाकरी, पुरी, बटर नान यांसह तंदुर रोटी हा देखील प्रसिद्ध रोटी प्रकार आहे. त्यातच, धाब्यावरील कोळशा भट्टीतील तंदुर रोटी चवीने खाल्ली जाते. मात्र, यापुढे कोळसा भट्टीतील तंदुर रोटी मुंबईकरांना खाता येणार नाही. कारण, कोळसा तंदूर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट (hotels) आणि ढाब्यांना मुंबई महापालिकेकडून (BMC) नोटीस बजावण्यात आली आहे. कारण, कोळसा तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजीचा वापर किचनमध्ये करण्याच्या सूचनादेखील महापालिकेनं दिल्या आहेत. यापुढे, मुंबईतील एकही बेकरी आता जळाऊ लाकडावर चालणार नाही, त्याऐवजी सिएनजी, पीएनजी वापरावे असे आदेशच आयुक्तांनी सर्व बेकरी चालक, रेस्टॉरंट आणि धाबा चालकांना दिल्या आहेत. हॉटेलचालकांनी 8 जुलैपर्यंत कोळसा तंदूर भट्टी ऐवजी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न केल्यास मुंबई महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही या नोटीसमधून सर्वच व्यवसायिकांना देण्यात आला आहे.
नोटीस बजावून आणि सूचना देऊन सुद्धा रेस्टॉरंट आणि ढाबा मालकांनी पालन न केल्यास परवाना रद्द करणे, दंड आणि कायदेशीर कारवाईसह कठोर कारवाई केली जाईल. 9 जानेवारीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीएमसीच्या हद्दीत लाकूड, कोळसा किंवा इतर पारंपारिक इंधन वापरणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे, कोळसा तंदूर भट्टीचा वापर करून तंदूर तयार करणाऱ्या हॉटेल मालकांना आता हॉटेलमध्ये बदल करावे लागणार आहेत. कोळसा भट्टीऐवजी इलेक्ट्रिक एलपीजी, पीएनजी, सीएनजी व इतर ग्रीन एनर्जीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासोबत मुंबईतील एकही बेकरी पुढील सहा महिन्यानंतर जळाऊ लाकडावर चालणार नाही, असेही सूचित करण्यात आले आहे.
दरम्यान, आतापर्यंत 84 ढाबे, हॉटेल, रेस्टॉरंट आणि तंदूर आस्थापनांना मुंबई महापालिकेकडून याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे, हॉटेल व धाबा मालकांचे धाबे दणाणले आहेत. मुंबई उच्च न्यालयाच्या आदेशानुसार महापालिकेनं सूचना जारी करुन रेस्टॉरंटचालक व धाबा मालकांना ही नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे, मुंबईत रेस्टॉरंट, बेकरी आणि धाबाचालकांची संख्या 1 हजारांच्या पुढे असेल. त्यातील बहुतांश चालक हे विद्युत उपकरणाचा वापर करतात. मात्र, अनेकजण अद्यापही जुन्याच पद्धतीचा अवलंब करत असून धाब्यांवर सर्रासपणे कोळशा भट्टीचाच वापर केला जातो. त्यामुळे, महापालिकेनं याची दखल घेत सक्तीने संबंधितांना नोटीसा बजावल्या आहेत.
हेही वाचा
Video: मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या मॅनेजरला शिवसेनेनं दाखवलं इंगा; हात जोडून मागितली माफी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

