(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टेम्पो चालकाचा मुलगा होणार DySP, सांगलीचा प्रमोद चौगुले MPSC परीक्षेत पुन्हा एकदा टॉपर
MPSC Result: सांगलीच्या प्रमोद चौगुले याच्या वडिलांनी टेम्पो चालवून आणि आईने शिवणकाम करुन प्रमोदला शिकवलं. त्यांच्या या कष्टाचं चीज झालं असून त्यांचा मुलगा राज्यात पहिला आला आहे.
सांगली: राज्यसेवा 2021 ची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून सांगलीचा प्रमोद चौगुले हा राज्यात पहिला आला आहे. सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला येण्याच्या बहुमान प्रमोद चौगुले याने मिळवला आहे. सध्या प्रमोद चौगुले नाशिक येथे उद्योग उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत. आता प्रमोद चौगुले खाकी वेशात दिसणार असून डीवायएसपी होण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
मिरज तालुक्यातील सोनी हे प्रमोद चौगुले यांचे मूळ गाव.पण गेल्या सात वर्षांपासून कामाच्या निमित्ताने चौगुले कुटुंब सांगलीत स्थायिक आहे. प्रमोद चौगुले याचं शिक्षण पलूस येथील नवोदय विद्यामंदिर आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण व वालचंद कॉलेजमधून झाले,आई-वडिलांचं ध्येय एकच होते. मुलांनी शिक्षण घ्यावं म्हणून प्रमोदच्या आई-वडिलांनी कधी त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही.
प्रमोदचे वडील टेम्पो चालक आणि आईने शिवणकाम करून संसाराचा गाडा चालवला. 2020 मध्ये प्रमोद चौगुले याने एमपीएससीमध्ये पहिला येण्याचा बहुमान मिळाला होता आणि त्यानंतर त्याची उद्योग विभागात उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली होती. त्याची नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे. मात्र त्याला पोलिस विभागात जायचं होतं, त्यामुळे त्यांनी 2021 मध्ये पुन्हा एमपीएससीची परीक्षा दिली. त्या परीक्षेचा निकाल आज लागला असून त्यामध्ये प्रमोद चौगुलेने पुन्हा राज्यात पाहिला येण्याचा मान पटकावला. आता त्याची डीवायएसपी म्हणून निवड होणार आहे.
एमपीएससीची गुणवत्ता यादी जाहीर
राज्यसेवा 2021 सालची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली असून सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला आला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शुभम पाटीलने बाजी मारली आहे. तर मुलींमध्ये सोनाली म्हात्रे हिने पहिला क्रमांक पटकवला असून एकूणात ती राज्यात तिसरी आली आहे. प्रमोद चौगुले हा सध्या उद्योग आणि उपसंचालक या पदावर नाशिक येथे कार्यरत आहे. गेल्या वर्षीही तो राज्यात पाहिला आला होता.
उमेदवारांकडून विहित पध्दतीने प्राप्त पसंतीक्रमाच्या आधारे अंतिम निकाल पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल
1- वेबलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व 20 संवर्गाकरीता 1 ते 20 मधील पसंतीक्रम अथवा No Preference' विकल्प निवडणे अनिवार्य आहे.
2- अधिसूचित सर्व संवर्गाकरिता 1 ते 20 मधील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार निवडीकरीता विचार होईल.
3- अधिसूचित 20 संवर्गापैकी / पदांपैकी ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक आहे; केवळ त्याच पदाकरिता पसंतीक्रम सादर करावेत. ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक नाही. त्या पदांकरीता 'No Preference' हा विकल्प
निवडावा.
4- संवर्गाचे पसंतीक्रम सादर केल्यानंतर 'Download PDF' हा पर्याय निवडून उमेदवारास सादर केलेले पसंतीक्रम जतन करून ठेवता येऊ शकतील.
5- पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या संवर्ग / पदांकरीता पसंतीक्रम सादर करतील केवळ त्याच संवर्ग/पदांवरील निवडीकरीता त्यांचा विचार करण्यात येईल.
6- विहित कालावधीनंतर संवर्ग/ पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची अथवा बदलण्याची उमेदवाराची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.