मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मिरा भाईंदर शहरातील प्लेझंट पार्क, ब्रँड फॅक्टरी ते साईबाबा नगरपर्यंत मेट्रोच्या खाली बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाला ‘रतन टाटा उड्डाणपूल’ असे नाव देण्याची मागणी मनसेने केली आहे.

मुंबई : देशातील दिग्गज उद्योगपती आणि दिवंगत पद्म विभूषण पुरस्कार विजेते रतन टाटा (Ratan tata) यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे केली होती. तसेच, कुठल्याही पुरस्कारप्राप्त व्यक्तीला त्याच्या हयातीतच तो पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. तर, रतन टाटा यांचे मुंबईसह महाराष्ट्र आणि देशासाठी मोठं योगदान असून टाटा कंपनीच्या माध्यमातून लाखो कर्मचाऱ्यांना, कुटुंबीयांना जगवण्याचं काम टाटा कंपनीने केलं. तसेच, देशावरील प्रत्येक संकटात टाटा ग्रुप ठामपणे उभा राहिल्याचंही आपण पाहिलं. त्यामुळेच, रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला होता. आता, मुंबईतील एका उड्डाणपुलास रतन टाटा यांचे नाव देण्याची मागणी करत मनसेनं आंदोलन केलं. मनसेचे (MNS) मीरा भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते.
मिरा भाईंदर शहरातील प्लेझंट पार्क, ब्रँड फॅक्टरी ते साईबाबा नगरपर्यंत मेट्रोच्या खाली बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाला ‘रतन टाटा उड्डाणपूल’ असे नाव देण्याची मागणी मनसेने केली आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार नरेंद्र मेहता आणि मिरा भाईंदर महानगरपालिकेचे संजय काटकर यांच्याकडे निवेदन दिले आहे. तसेच, आज यासंदर्भातील मागणीसाठी आंदोलन देखील करण्यात आलं होतं. सदर उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले असले तरी अद्याप त्याला अधिकृत नाव देण्यात आलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर या पुलास रतन टाटा यांचे नाव देण्याची मागणी होत आहे.
टाटांचं मुंबई अन् देशासाठी मोठं योगदान
दिवंगत रतन टाटा हे प्रसिद्ध उद्योगपती होते, त्यांनी देशासाठी आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या कार्याची आठवण कायम राहावी म्हणून या पुलाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील ताज हॉटेल ही टाटा ग्रुपची आणि देशाची ओळख आहे. 26/11 च्या हल्ल्यात मुंबईतील याच ताज हॉटेलवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. त्यावेळी, या हॉटेलसह रतन टाटा यांनी घेतलेली भूमिका, सर्वांना केलेली मदत आणि कोरोना काळात कोविड योद्धांसाठी खुलं केलेलं ताज हॉटेल हे कुणीही विसरणार नाही. मुंबईकर तर अजिबात विसरणार नाही. त्यामुळे, रतन टाटा यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करत मनसेकडून उड्डाणपुलास रतन टाटांचे नाव देण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा























