Beed : बीडमधील साईराम मल्टीस्टेट बँक अडचणीत, सर्वच शाखा अचानक बंद झाल्याने ठेवीदारांची बँकेसमोर गर्दी
Shri Sairam Urban Multistate Bank : बीडसह इतर जिल्ह्यांमध्ये साईराम मल्टीस्टेट बँकेच्या 20 हून अधिक शाखा आहेत, त्यामध्ये 150 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
बीड: जिल्ह्यामध्ये 20 पेक्षा अधिक शाखा असलेल्या साईराम मल्टीस्टेट बँक (Shri Sairam Urban Multistate Bank ) ही अडचणीत आली आहे. बँकेच्या सर्वच शाखा अचानक बंद असल्याने ठेवीदारांनी आपले पैसे काढण्यासाठी बँकेसमोर एकच गर्दी केली आहे. गेल्या 13 वर्षापासून बीडसह इतर जिल्ह्यामध्ये साईराम अर्बन या बँकेच्या 20 पेक्षा अधिक शाखा असून यामध्ये 152 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. मात्र बँक अचानक बंद झाल्याने ठेवीदारांनी पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.
या सर्व प्रकरणानंतर अचानक ठेवीदारांनी ठेवी काढल्यामुळे बँकेत कॅश शिल्लक नसल्याचे बँकेचे संस्थापक साईनाथ परभणी यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं. सर्व ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी काही वेळ देण्यात यावा अशी विनंती त्यांनी ठेवीदाराकडे व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. काही दिवसांपूर्वीच बीड मधील जिजाऊ मल्टीस्टेट ही बँक बंद पडली होती आणि त्यानंतर आता साईराम मल्टीस्टेट ही खाजगी बँक अडचणीत आली आहे. त्यामुळे ठेवीदार आपल्या पैशाची मागणी करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच जिजाऊ मल्टीस्टेट बँक बंद
काही दिवसांपूर्वीच जिजाऊ मल्टीस्टेट बँकेवर कारवाई करण्यात आली होती. बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट या बँकेने जास्तीच्या व्याजदराचं आमिश दाखवून अनेकांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी आपल्या बँकेत ठेवून घेतल्या होत्या. जेव्हा पैसे परत देण्याची वेळ आली, तेव्हा बँक आर्थिक संकटात सापडल्याचा बहाणा बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांनी केल्यानंतर ठेवीदारांच्या तक्रारीवरून बँकेच्या अध्यक्षासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बँक सील करून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास करून बँकेच्या अध्यक्ष अनिता शिंदे यांना अटक केली आहे. अटक करून त्यांना बीडच्या न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस त्यांची अधिक चौकशी करत आहेत. तर यामध्ये संचालक मंडळाचा सहभाग असल्यास त्यांच्यावर देखील पोलीस कारवाई करणार आहेत.
लोकांना जास्त व्याजदराचं प्रलोभन दाखवून माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटनं ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा करुन घेतल्या. बँकेच्या अध्यक्ष आणि त्यांचे पती तथा संचालक असणाऱ्या बबन शिंदे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ठिकठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केल्या. त्यानंतर इतर ठिकाणी यामधील काही पैसा खर्च केला. यासह विविध ठिकाणी त्याचा वापर करण्यात आला.
ही बातमी वाचा: