Walmik Karad Beed Police: वाल्मिक कराडला ठेवलेल्या पोलीस स्टेशनमध्ये अचानक 5 पलंग का आणले? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Walmik Karad: वाल्मिक कराड यांना सध्या बीड शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. वाल्मिक कराडांसाठी पलंग आणण्यात आला होता का, पोलिसांचं स्पष्टीकरण
बीड: सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहभाग असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराड यांचा बीड शहर पोलीस ठाण्यातील मुक्काम सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. वाल्मिक कराड यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यामुळे त्यांना सध्या बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. मात्र, बुधवारी या पोलीस ठाण्यात अचानक पाच पलंग (कॉट) आणण्यात आल्याने वादाला तोंड फुटले होते. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावरुन वाल्मिक कराड यांना पोलिसांकडून व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आता बीड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या प्रकाराविषयी आपली बाजू मांडली.
बीड शहर पोलीस ठाणे हे नव्याने बांधण्यात आले आहे. आम्ही दीड महिन्यांपूर्वी नव्या पोलीस ठाण्यात शिफ्ट झालो. याठिकाणी अंमलदार आणि अधिकाऱ्यांसाठी असलेल्या सुविधा पुरवण्याचे काम अजून सुरु आहे. पोलीस ठाण्यातील आरोपींसाठी गार्ड तैनात केलेले असतात. हे गार्ड 24 तास पोलीस ठाण्यात असतात. त्यांना आराम मिळणे गरजेचे असते. पोलीस ठाण्यात रेस्टरुम आहे, पण त्याठिकाणी झोपण्यासाठी पलंग नाही, त्याची सोय करावी, अशी मागणी गार्डसकडून करण्यात आली होती. वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांच्या गरजा पूर्ण करणे आमची जबाबदारी आहे. मी प्रभारी अधिकाऱ्यांना कॉट आणायला सांगितल्या. त्यानुसार पोलीस मुख्यालयातून या कॉट आणल्या गेल्या, असे सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी म्हटले. मात्र, हे पलंग वाल्मिक कराड आणल्यानंतरच का आणण्यात आले, असा प्रश्न सचिन पांडकर यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटले की, हा निव्वळ योगायोग होता. नवीन पोलीस ठाण्याचे काम सुरु आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. मात्र, याठिकाणी आणण्यात आलेला फक्त 1 पलंग आत नेण्यात आला, बाकी 4 पलंग बाहेर का ठेवण्यात आले, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्यावर पांडकर यांनी म्हटले की, तो एक पलंग महिला अंमलदारांच्या रुममध्ये नेण्यात आला. आमचं म्हणणं आहे की, सोशल मीडियावर काही टाकण्यापूर्वी ते खरं आहे तपासावं. प्रसारमाध्यमांनी तुमच्याकडे कुठलीही माहिती आली तर वरिष्ठांना विचारुन खातरजमा करावी, असे आवाहन पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांनी केले.
रोहित पवारांनी नेमका काय आरोप केला होता?
बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत. स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत. नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा.
आणखी वाचा
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा