धक्कादायक! बीडमध्ये नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
Crime News Update : नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Beed Latest Marathi Crime News Update : बीड जिल्ह्यातील केजमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकारी अधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यामुळे केजमध्ये या प्रकरणाची चर्चा होत आहे. कौटुंबिक वादातून आशा वाघ यांच्यावर हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही कौटुंबिक वादातून त्यांच्या भावानेच त्यांच्यावर हल्ला केला होता.
केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना घडली आहे. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आशा वाघ यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या असून सध्या त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नायब तहसीलदार आशा वाघ आज दुपारी जेवण करून तहसील कार्यालयाकडे मोपेडवरून येत होत्या. त्याचवेळी एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडवला. त्यातून उतरलेल्या एका महिलेसह इतर 4 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बॉटलमधील पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत. केज येथील सरकारी रुग्णालयात आशा वाघ यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस या घटनेचा तपास घेत आहेत. हल्लेखोर फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
यापूर्वीही झाला होता हल्ला-
नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर याआधीही जीवघेणा हल्ला झाला होता. कौटुंबिक वादातून त्यांचा भाऊ मधुकर वाघ यांनी हल्ला केला होता. जून 2022 मध्ये मधुकर वाघ यांनी कोयत्याने आशा यांच्या मानेवर आणि डोक्यात वार केले होते. या हल्ल्यात नायब तहसीलदार आशा वाघ या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा कामावर रूजू झाल्या होत्या. पण आज त्यांच्यावर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झाला आहे.
भावानेच हल्ला केल्याची शक्यता -
गेल्या काही दिवसांपासून आशा वाघ आणि त्यांच्या भावामध्ये शेतीच्या कारणावरून वाद सुरू आहे. आशा वाघ यांच्यावर आज हल्ला करणाऱ्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. पण मधुकर वाघ यांचा या हल्ल्याच्या मागे हात असल्याची चर्चा आहे. पण आधीच्या हल्ल्याप्रकरणी मधुकर वाघ सध्या तुरुंगात आहेत. पण त्यांच्या कुटुंबियांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. आज झालेल्या हल्ल्याचा पोलीस कसून तपास करत आहेत. आरोपी हल्ल्यानंतर फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.