(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maruti Suzuki Car: आजपासून कार घेणं महाग; मारुतीच्या सर्व कार मॉडेल्सच्या किमतीत वाढ
Maruti Suzuki Car Price : मारुती सुझुकीने आपल्या सर्व मॉडेलच्या किंमतीत वाढ केली आहे. आजपासून ही दरवाढ लागू झाली आहे.
Maruti Suzuki Car Price : आजपासून म्हणजेच १८ एप्रिलपासून कार घेणं महाग झाले आहे. किंमत वाढवण्यामागचं कारण म्हणजे इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यानं मार्जिन परिणाम होतो आहे; त्यामुळे किंमत वाढवल्याचं मारुती सुझुकी कंपनीचं म्हणणं आहे. खरंतर मध्यम वर्गाच्या पसंतीच्या गाड्या म्हणून मारुती सुझुकीच्या गाड्या ओळखल्या जातात. परंतु याबाबत स्वत: मारुती सुझुकीनेच 18 एप्रिलपासून सर्व मॉडेल्सच्या किंमती सरासरी 1.3% ने वाढवल्या जात असल्याचं सांगितलं आहे.
मारुती सुझुकी कंपनीने अगोदरच म्हणजे ६ एप्रिल रोजी दरवाढीची घोषणा केली होती. याआधी १ एप्रिलपासून मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, टोयोटा या कंपन्यांनीही आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. त्याच वेळी, टाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 2.5% पर्यंत वाढवल्या आहेत.
मॉडेलनुसार वाहनांच्या किमतीत वाढ
मारुती सुझुकीने जारी केलेल्या निवेदनानुसार किमतीत वाढ झाल्यामुळे किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी या महिन्यात वाहनांच्या किमती वाढवणार आहे. प्रत्येक मॉडेलनुसार वाहनांच्या किमती वाढवल्या जातील. गेल्या एका वर्षात विविध इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने कंपनीच्या मार्जिनवर परिणाम होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने आता वाढीव खर्चाचा काही भाग ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उत्पादनांची किंमत वाढवली गेली आहे.
1 एप्रिलपासून अनेक कंपन्यांनी किमती वाढवल्या
1 एप्रिल 2022 पासून टोयोटा, मर्सिडीज, ऑडीसह अनेक ऑटो कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. टाटा मोटर्सनेही आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. ऑटो कंपन्यांचे म्हणणे आहे की, जागतिक बाजारात वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे इनपुट कॉस्ट वाढली आहे. यामुळे कंपन्यांनी उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटरने सर्व उत्पादनांच्या किमती 4% पर्यंत वाढवल्या आहेत. बीएमडब्ल्यू आणि ऑडी कारही ३.५ टक्क्यांनी महागल्या आहेत. मर्सिडीजने 1 एप्रिलपासून किमतीत 3% वाढ केली आहे. तर, टाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 2.5% पर्यंत वाढवल्या आहेत.