औरंगाबादच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे रविंद्र जंजाळ, एमआयएमच्या 2 नगरसेवकांचं शिवसेनेला मतदान
औरंगाबादच्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीला आज 100 नगरसेवक उपस्थित होते. शिवसेनेला 100 पैकी एकूण 51 मतं मिळाली आहेत. एमआयएमच्या 2 नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केलं.
औरंगाबाद : शिवसेना-भाजपसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या औरंगाबाद महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे उपमहापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या 6, राष्ट्रवादीच्या 2 आणि एमआयएमच्या 2 सदस्यांच्या बळावर राजेंद्र जंजाळ विजयी झाले आहेत.
आज महापालिकेत मतदानासाठी एमआयएमचे 16 नगरसेवक उपस्थित होते. त्यातील दोन नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केलं तर एका नगरसेवकाने अपक्ष उमेदवाराला मतदान केलं. तर उपमहापौरपद न मिळाल्याने नाराज असलेल्या काँग्रेस नगरसेवक अफसर खान यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांना एकूण 51 मतं
उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज 100 नगरसेवक उपस्थित होते. शिवसेनेला 100 पैकी एकूण 51 मतं मिळाली आहेत. यामध्ये शिवसेनेची 29, अपक्ष गटाची 12, काँग्रेसची 6, राष्ट्रवादीची 2 आणि एमआयएमच्या 2 मतांचा समावेश आहे. काँग्रेसचे एकूण 11 नगरसेवक आहेत, त्यापैकी केवळ 6 नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केलं, तर 3 नगरसेवक गैरहजर होते आणि दोन नगरसेवक तटस्थ राहिले. राष्ट्रवादीची 2 मतं मिळाली तर 2 नगरसेवक गैरहजर राहिले.
एमआयएमच्या सहा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी
उपमहापौरपदाच्या निवडीदरम्यान एमआयएमचे 5 नगरसेवक अनुपस्थित होते. तर दोन नगरसेवकांनी शिवसेनेला तर एका नगरसेवकाने भाजपप्रणित अपक्ष उमेदराला मतदान केलं. याप्रकरणी एमआयएम खासदार इम्तियाज जलिल यांनी गैरहजर 5 आणि भाजप प्रणित अपक्ष उमेदवाराला मतदान केलेल्या एका अशा एकूण सहा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर शिवसेनेला मतदान केलेल्या दोन नगरसेवकांनी आधीच पक्षाने हकालपट्टी केली आहे.
शिवसेना-भाजपची 27 वर्षांची युती तुटली
विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेवरुन शिवसेना आणि भाजप युती तुटली. त्याचाच परिणाम आता औरंगाबाद महापालिकेतही पाहायला मिळाला. औरंगाबाद महापालिकेत गेली 27 वर्ष शिवसेना-भाजपाची निर्विवाद सत्ता होती. मात्र भाजपाने शिवसेनेसोबत काडीमोड घेतली. विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा देत औरंगाबाद महापालिकेतून भाजपा सत्तेतून बाहेर पडली होती.
औरंगाबाद महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना - 29 भाजप - 23 एमआयएम- 24 कॉंग्रेस - 11 राष्ट्रवादी - 04 बीएसपी- 05 डेमोक्रेटिक- 02 अपक्ष- 17
संबंधित बातम्या