(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! NIA-ATS कडून औरंगाबादसह परभणीत छापेमारी;पॉप्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात
Aurangabad ATS: दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून देशातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी सुरू आहे.
NIA Raids PFI Maharashtra: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी (NIA Raids on PFI office) सुरू केली आहे. ज्यात औरंगाबादमधून एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून देशातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी सुरू आहे. ज्यात औरंगाबादच्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर सुद्धा एटीएस आणि एनआयए च्या पथकाने कारवाई केली आहे. औरंगाबादच्या जिन्सी भागात हे कार्यालय होते. तर या कारवाईत पथकाने एकूण चार जणांना ताब्यात घेतले आहे. ज्यात नॅशनल कॉलनीतुन सय्यद फ़ैसल, बायजीपुरा भागातून पॉप्युलर फ्रंटचा माजी जिल्हाध्यक्ष शेख़ इरफ़ान, नासिर नदवी आणि परवेज़ खान याला बायजीपुरा येथून ताब्यात घेतले आहे.
परभणीतून चौघांना ताब्यात घेतले..
औरंगाबादप्रमाणे परभणीत सुद्धा अशीच कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद एटीएस पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. ज्यात परभणी येथील चौघांना एटीएस पथकाने ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नावं अजून समोर आली नाही. मात्र या कारवाईनंतर परभणी शहरात खळबळ उडाली आहे.
रात्रीच्या सुमारास कारवाई...
मिळालेल्या माहितीनुसार एटीएस आणि एनआयएच्या पथकाने बुधवारी रात्रीच्या सुमारास औरंगाबादच्या जिन्सी भागातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापा टाकला होता. त्यानंतर या पथकाने माजी जिल्हाध्यक्षसह चौघांना ताब्यात घेतले असल्याचे समोर आले आहे. तर कारवाईसाठी आलेल्या पथकाने स्थानिक पोलिसांची सुद्धा मदत घेतली होती. तसेच सद्या जिन्सी भागातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयाच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
यापूर्वी 'ईडी'ची कारवाई...
औरंगाबादच्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेच्या कार्यालयावर यापूर्वी 2020 मध्ये ईडीच्या पथकाने कारवाई केली होती. शहरातील जुना बायजीपुरा म्हणजेच जिन्सी भागातील कार्यालयावर ईडीच्या पथकाने पोलिसांना सोबत घेऊन छापेमारी केली होती. यावेळी सुमारे अडीच तास कार्यालयाची झाडाझडती घेऊन आणि दोन पदाधिकाऱ्यांची चौकशी करून ईडीच पथक परतले होते. विशेष म्हणजे आज ताब्यात घेण्यात आलेल्या इरफान शेख ( मिल्ली) याची ईडीच्या पथकाने चौकशी केली होती.
महत्वाच्या बातम्या...
NIA, ATS Raids Live Updates : केंद्रीय तपास यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये, महाराष्ट्रातसह देशभरात छापेमारी, वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर....