Akola News: अकोला विनयभंगप्रकरणी मोठी कारवाई, नराधम शिक्षक सेवेतून बडतर्फ
काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकाने मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेत आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनींना अश्लिल व्हिडीओ दाखवत त्यांचा छळ केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे.
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर (Akola News) तालुक्यातल्या काजीखेड येथील विद्यार्थिनींचे छेडखानी आणि विनयभंग प्रकरण आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरोपी शिक्षक प्रमोद सरदारला सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. तर शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र समदूर आणि केंद्रप्रमुखाला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलंय. तर आता अनेक राजकीय पक्षांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केलीये.
अकोल्यातील काजीखेडच्या जिल्हा परिषद शाळेत झालेल्या प्रकारामुळे जनमानस चांगलंच संतप्त झालंय. शाळेतील शिक्षक प्रमोद सरदार याने आठ वर्गातील सहा विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज या विरोधात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत दोषींवर कडक कारवाईची मागणी केलीये. दरम्यान प्रकरणातील आरोपी शिक्षक प्रमोद सरदारवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलीये. त्याला जिल्हा परिषदेने शिक्षक पदावरून बडतर्फ केलंय. दरम्यान बाळापूर ते ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज गावातील शाळेला भेट दिलीये. त्यांनी आरोपी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी सरकारकडे केलीये.
विद्यार्थीनींना अश्लिल व्हिडीओ दाखवत त्यांचा छळ
काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकाने मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेत आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनींना अश्लिल व्हिडीओ दाखवत त्यांचा छळ केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे. चित्रफित दाखवित असताना त्याने मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श करत अश्लील संभाषण केले. हा प्रकार मागील चार महिन्यांपासून सुरू असल्याचा आरोप या शिक्षकांवर विद्यार्थीनींनी केला आहे.
आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
संतप्त झालेल्या पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दरम्यान विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी या शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली..
हे ही वाचा :
चिमुकल्या लेकींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं वकीलपत्र घेण्यासाठी एकही वकील पुढे येईना, कल्याण कोर्टात काय घडलं?