(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abdul Sattar: दीपक गवळी माझा पीए! पीए म्हणून कोणत्या कृषी अधिकाऱ्याला नेमायचं तो माझा प्रश्न : अब्दुल सत्तार
Mahrashtra: कृषी विभागाने अकोल्यात टाकलेल्या धाडीनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले, पथकाने पैशांची मागणी केल्याची माहिती मिळाल्यावर या पथकात कृषिमंत्र्यांचा पीए असल्याचं देखील समोर आलं.
Abdul Sattar: कृषी विभागाच्या कथित पथकाने अकोल्यामध्ये टाकलेल्या धाडीच्या प्रकरणात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कृषिमंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यापासून मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) सातत्याने कोणत्या ना कोणत्या अडचणीत सापडत आहेत. याचदरम्यान कथित कृषी पथकाने टाकलेल्या धाडीदरम्यान या पथकात सहभागी असलेल्यांनी पैशाची मागणी केली असल्याची तक्रार कंपन्यांकडून करण्यात आली आहे. या पथकात सत्तारांचा पीए दीपक गवळी याचा देखील समावेश होता.
'दीपक गवळी माझा पीए; कुणाला पीए म्हणून नेमायचं हा माझा प्रश्न'
कथित कृषी पथकाचे धाड प्रकरण अंगाशी येताच व्यावसायिकांकडून लाच मागणारा दीपक गवळी हा आपला स्वीय सहाय्यक, म्हणजेच पीए नसल्याची प्रतिक्रिया कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी 10 जूनला अकोल्यात दिली होती. मात्र, 20 दिवसांपुर्वीच्या संभाजीनगरमधील त्यांच्या शासकीय दौऱ्यात गवळीचा उल्लेख स्वीय सहाय्यक (PA) असा आहे. यानंतर आता दीपक गवळी हा माझा पीए आहे, अशी कबुली कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. कृषी विभागाचा कोणताही माणूस मी पीए म्हणून घेऊ शकतो आणि त्यासाठी मला कुणाची परवानगी घेण्याची गरज नाही, असं वक्तव्य आता अब्दुल सत्तारांनी केलं आहे. माझ्या विभागाचे कोणते लोक घ्यायचे, हा माझा प्रश्न असल्याचं सत्तार म्हणाले.
छापे टाकणाऱ्या पथकाची नेमणूक मीच केली - सत्तार
याविषयी एबीपी माझाने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संवाद साधला, यावेळी हे पथक मीच नेमलं, अशी प्रतिक्रिया सत्तारांनी दिली. अकोल्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणांचा पुरवठा आहे आणि चढ्या भावात त्यांची विक्री होत असल्याची तक्रार कानावर आल्यावर गोपनिय पद्धतीने छापा टाकण्यासाठी हे पथक नेमल्याचं सत्तारांनी सांगितलं.
कृषिमंत्र्यांच्याच जिल्ह्यात शेतकऱ्यांची सर्रास लूट
दुसरीकडे, राज्यात बोगस बियाणं आणि वाढीव दराने त्याची विक्री करणाऱ्या लोकांविरोधात धाडसत्र सुरू आहे. मात्र, कृषिमंत्र्यांच्याच जिल्ह्यात बियाणं घेताना शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू असल्याचं एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलं आहे.
'बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार'
अकोल्यात केलेली कारवाई ही अधिकृत असल्याचं सत्तार म्हणाले. कृषी खात्याचा मंत्री असेपर्यंत बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करत राहणार असं वक्तव्य देखील अब्दुल सत्तारांनी केलं आहे. तर, ज्या विक्रेत्यांनी बोगस बियाणांचा साठा ठेवला असेल, त्यांनी तो त्वरित काढून टाकावा आणि नष्ट करावा, असे आवाहन देखील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना केले आहे. 1800-2334-000 या टोल फ्री नंबरवर शेतकऱ्यांनी बियाण्यांसंबंधित तक्रारी द्याव्या, त्याची शहानिशा करुन त्वरित कारवाई केली जाईल, असं आवाहन देखील सत्तार यांनी केलं आहे.
हेही वाचा: