(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abdul Sattar PA News: अब्दुल सत्तारांच्या 'त्या' दाव्याला सुरुंग, दीपक गवळीचं नियुक्तीपत्र 'एबीपी माझा'च्या हाती
Abdul Sattar PA News: गवळी याची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे सत्तार यांचे पत्र समोर आल्याने त्यांच्या दाव्याला 'सुरुंग' लागले आहे.
Abdul Sattar PA News: कृषीमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यापासून मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) सातत्याने कोणत्या ना कोणत्या अडचणीत सापडत आहे.दरम्यान आता पुन्हा एकदा त्यांच्या खात्यासंबंधी एका प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत आहे. कृषी विभागाच्या (Agriculture Department) वतीने अकोल्यामध्ये टाकण्यात आलेल्या धाडीत चक्क खाजगी लोकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे याच धाडीत कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकात समावेश असलेले दीपक गवळी नावाचे व्यक्ती सत्तार यांचे पीए असल्याचे समोर आले आहे. मात्र सत्तार यांनी हे आरोप फेटाळून लावत गवळी आपले पीए नसल्याचे सांगितले होते. मात्र गवळी यांची उसनवारी तत्वावर विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याचे खुद्द कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रधान सचिव कृषी मंत्रालय आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेशित केलेले पत्रच समोर आले आहे. 14 नोव्हेंबर 2022 रोजीचे हे पत्र आहे. त्यामुळे सत्तार उघडपणे खोटे बोलत असल्याचा आरोप होत आहे.
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावे अकोल्यामध्ये कृषी विभागाच्या कथीत पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकारी नसलेल्या अनेक खासगी व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती समोर आली होती. ज्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका माजी जिल्हा परिषद सदस्यांचा देखील समावेश होता. यात अब्दुल सत्तार यांचा स्वीय सहाय्यक दीपक गवळी याचा देखील समावेश असल्याचे उघड झाले आहे. अशातच या पथकाने पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकाकडून करण्यात आला आहे. तर याबाबत संबधित खत कंपनीच्या व्यवस्थापकाकडून या पथकावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
सत्तार यांच्या दाव्याला 'सुरुंग'
कृषी विभागाच्या विरोधात तक्रार करणाऱ्या कंपनी विरोधात कृषी विभागाने कारवाई सुरू केली आहे. मात्र, या धाडीत काही चुकीचं झाले नसल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटल आहे. या मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांनी मला सांगूनच तेथे हजेरी लावली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. अकोल्यातून अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे ही कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले. तर या पथकाने पैशाची मागणी केली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे मंत्री सत्तार माध्यमाशी बोलताना म्हणाले. विशेष म्हणजे याचवेळी त्यांनी गवळी आपला पीए नसल्याचे देखील म्हटले आहे. पण आता गवळी याची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे सत्तार यांचे पत्र समोर आल्याने सत्तार यांच्या दाव्याला 'सुरुंग' लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: