Shirdi Loksabha : शिवसेना भवनमध्ये बैठक पण शिर्डीचा तिढा कायम; बबनराव घोलप यांच्या कार्यकर्त्यांचा वाकचौरे यांच्या उमेदवारीला विरोध
Babanrao Gholap : आम्हाला उद्धव ठाकरे यांना भेटायचे आहे, त्यांनी मातोश्रीवर भेटण्यासाठी त्यांनी आम्हाला वेळ द्यावा अशी मागणी बबनराव घोलप यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
मुंबई: शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Loksabha) उमेदवारी कुणाला द्यायची यावरून तिढा अद्याप कायम आहे. त्याचसंबंधित आज शिवसेना भवनवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap)यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. बबनराव घोलप हे निष्ठावंत म्हणून आपल्याकडे राहिले आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांची शिवसेना भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीला शिर्डी लोकसभेतील स्थानिक पदाधिकारी, जिल्हाप्रमुख प्रमोद लबाडे, संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर, आमदार सुनील शिंदे उपस्थित होते. या बैठकीमध्ये शिर्डी येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. बबनराव घोलप हे निष्ठावंत म्हणून आपल्याकडे राहिले आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच आम्हाला आमचं म्हणणं उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडायच आहे. त्यासाठी बबनराव घोलप यांच्यासह आम्हाला 'मातोश्री'वरून उद्धव ठाकरे यांची वेळ द्यावी अशी मागणी स्थानीक पदाधिकाऱ्यांनी सुनील शिंदे यांच्याकडे केली.
शिवसेना भवननातून कार्यकर्त्यांना संदेश काय दिला?
भाऊसाहेब वाकचौरे यांची पुन्हा इच्छा होती की पुन्हा शिवसेनेत यावं त्यासाठी त्यांना प्रवेश दिला आहे. त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही, त्यामुळे संभ्रम निर्माण करून घेऊ नका. ज्या पद्धतीने काम सुरु आहे त्यापेक्षा जोमाने काम सुरु ठेवा असे आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांना बैठकीत देण्यात आले आहेत.
बबनराव घोलप नाराज
उद्धव ठाकरे यांचा अहमदनगर (Ahmednagar) दौरा झाल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी माजी आमदार शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना पाठवत आपली भूमिका जाहीर केली. यानंतर दोन दिवसांनी बबनराव घोलप यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. तत्पूर्वी संजय राऊत यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलवले होते. त्या चर्चेनंतरही मार्ग निघू शकलेला नाही.
एकीकडे काही दिवसांपूर्वीच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा ठाकरे गटात प्रवेश झाल्यानंतर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी (Shirdi Loksabha) वाकचौरे यांच्या उमेदवाराची चर्चा सुरु झाल्यानंतर बबनराव घोलप हे अस्वस्थ होते. जर वाकचौरेंना उमेदवारी द्यायची होती तर मला का आश्वासन दिले? माझं संपर्क प्रमुखपद का काढून घेण्यात आलं? शिवाय, उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्यासंदर्भात मला का कळवण्यात आलं नाही असे सवाल विचारत घोलप यांनी पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला.
संबंधित बातमी वाचा :