(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shirdi News : बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डीचा उमेदवार कोण? सेना भवनातील बैठकीकडे राज्याचं लक्ष
Nashik News : माजी आमदार बबनराव घोलप यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना (Shivsena) भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : शिवसेना उपनेते बबनराव घोलप (Baban Gholap) यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्यापही यावर खल सुरु आहे. खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी दोन दिवसांची दिलेली मुदतही संपली असून आज याच पार्श्वभूमीवर बबनराव घोलप यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना (Shivsena) भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात शिर्डी (Shirdi) लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून मात्र या बैठकीला घोलप मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाऊसाहेब वाकचौरेंना बळ देण्यात आल्यानं घोलप नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
उद्धव ठाकरे यांचा अहमदनगर (Ahmednagar) दौरा झाल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी माजी आमदार शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना पाठवत आपली भूमिका जाहीर केली. यानंतर दोन दिवसांनी बबनराव घोलप यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. तत्पूर्वी संजय राऊत यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलवले होते. त्या चर्चेनंतरही मार्ग निघू शकलेला नाही. एकीकडे काही दिवसांपूर्वीच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा ठाकरे गटात प्रवेश झाल्यानंतर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी (Shirdi Loksabha) वाकचौरे यांच्या उमेदवाराची चर्चा सुरु झाल्यानंतर बबनराव घोलप हे अस्वस्थ होते. जर वाकचौरेंना उमेदवारी द्यायची होती तर मला का आश्वासन दिले? माझं संपर्क प्रमुखपद का काढून घेण्यात आलं? शिवाय, उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्यासंदर्भात मला का कळवण्यात आलं नाही असे सवाल विचारत घोलप यांनी पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला.
दरम्यान अद्यापही बबनराव घोलप यांची नाराजी दूर झालेली नसल्याने आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडविण्यासाठी आज शिवसेना भवनात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित राहणार असून स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी, वरीष्ठ पदाधिकारी यांची मते जाणून घेणार आहे. एकीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे. बबनराव घोलप इच्छुक असताना माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना बळ देण्यात आल्यानं बबन घोलप नाराज असल्याची माहिती आहे. नाराज असलेल्या घोलप यांनी उपनेते पदाचा राजीनामा देत, संजय राऊत यांची चार दिवसापूर्वी मुंबईत भेट घेतली होती.
बबनराव घोलप यांची अनुपस्थिती
तसेच संजय राऊत यांच्यां भेटीनंतर आज स्थानिक पदाधिकाऱ्यांचे विचार जाणून घेणार आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर रविवारी बबन घोलप समर्थक मुबंईत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. तसेच शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळाचे दर्शन घेणार असून आजच्या बैठकीला बबनराव घोलप उपस्थित नसणार आहेत. तर नाराजीच्या पार्श्वभूमीवर बबनराव घोलप यांना उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी अद्याप वेळ दिलेली नाही. मागील आठवड्यात घोलप यांनी वेळ मागितली होती, तेव्हा संजय राऊत यांच्याशी चर्चा करावी, असं ठाकरेंकडून सांगण्यात आलं. संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. त्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील गणिते समोर येणार आहेत, त्यानंतर बबनराव घोलप यांची नाराजी दूर होते की नाही हेही समोर येईल.
इतर महत्वाची बातमी :