Ahmednagar News : जातपंचायतीचा जाच! श्रीरामपूरमध्ये डाॅक्टर कुटुंबावर बहिष्कार, तीन महिन्यापासून त्रास
Ahmednagar News : कागदावरून जातपंचायत महाराष्ट्रातून हद्दपार झाली असली तरीही मानसिकतेतून मात्र गेली नसल्याचा प्रत्यय एका कुटुंबाला आला आहे. एका डॉक्टराच्या कुटुंबीयांना जातीतून बहिष्कृत करण्यात आले आहे.
Ahmednagar News : जातपंचायत महाराष्ट्रातून (Maharashtra) हद्दपार झाली असली तरीही मानसिकतेतून मात्र गेली नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा एका कुटुंबाला आला आहे. श्रीरामपूर (Srirampur) तालुक्यातील निपाणी वडगाव गावातील आपल्याच समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा विरोधात लढणाऱ्या सुशिक्षित डाॅक्टरच्या कुटूंबालाच वैदू समाजाने वाळीत टाकल्यात आल्याचे समोर आले आहे.
अंनिसच्या माध्यमातून 2013 ला जातपंचायत मूठमाती आंदोलन (Protest) राज्यात सुरू झालं आणि एप्रिल 2015 मध्ये वैदू समाजाच्या जातपंचायतला मूठमाती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. मात्र, जातपंचायतीचा (Jatpanchayat) जाच काही केल्या सुटत नसल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे राहणारे डाॅक्टर चंदन लोखंडे (Dr. Chandan Lokhande).. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वैदू समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा, जातपंचायत या विरोधात ते लढा देत आहेत. समाजातील तरूणांनी उच्च शिक्षण घेऊन समाजातील अस्पृश्यतेची दरी दूर करावी यासाठी काम करत आहेत.
दरम्यान बंद झालेली जातपंचायत काही दिवसापूर्वी रंगपंचमीच्या (Rangpanchami) दिवशी पाथर्डी तालुक्यातील मढी येथे पुन्हा भरली होती. याबाबतचा एका व्हिडीओ समोर आला आहे. तीन महिन्यापूर्वीच चंदन लोखंडे यांच्या परिवारावर जातपंचायतने अघोषित बहिष्कार टाकला असल्याचं आता समोर आलं आहे. जातपंचायतने लोखंडेच्या कुटूंबावर बहिष्कार टाकल्याने काही दिवसापासून चंदन लोखंडे यांच्या कुटुंबाला कोणत्या कार्यक्रमात बोलावलं जात नाही, तर त्यांच्या घरीही कोणी जात नाही. पंधरा दिवसापूर्वी चंदन लोखंडे यांच्या आईचे निधन झाले. मात्र त्यांच्या सांत्वनाला किंवा दशक्रीया विधीलाही जातपंचायतच्या फतव्यामुळे नातेवाईकांना जाता आले नाही.
अंनिसकडून कठोर कारवाईची मागणी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी वैदू समाज जातपंचायत बंद व्हावी. यासाठी मोठा लढा उभारला होता. यातून जातपंचायत विरोधी कायदाही अंमलात आला. जातपंचायतही रद्द करण्यात आली. मात्र आता पुन्हा नव्याने जातपंचायत सुरू झाल्याने सरकार आणि पोलिसांनी यावर कठोर पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली. तर लोखंडे यांची सुद्धा तक्रार आमच्याकडे आली असल्याचे अंनिसच्या राज्य समन्वयक रंजना गवांदे यांनी स्पष्ट केलं. 2013 मध्ये सुरू झालेल्या जातपंचायत मूठमाती आंदोलनामुळे 16 जातपंचायत बरखास्त झाल्या होत्या. जातपंचायतीने घातलेल्या सामाजिक बहिष्काराच्या बातम्या पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. मात्र आता पुन्हा एकदा जातपंचायत सुरू झाल्याचे प्रकार समोर येत असताना सरकारने आणलेला कायद्याची कठोर अंमलबजावणी करणार का याकडं राज्याच लक्ष लागलं आहे.