Ahmednagar News : रस्त्यावरच लिहिलं 'शरद पवार गो-बॅक', पवारांच्या अहमदनगर दौऱ्याला पारनेर कारखाना बचाव समितीचा विरोध
Ahmednagar News : शरद पवार यांच्या पारनेर दौऱ्याला पारनेर कारखाना बचाव आणि पुनर्जीवन समितीने विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर रात्री पारनेरच्या रस्त्यावर "शरद पवार-गो बॅक' असं लिहिण्यात आलं आहे.
Ahmednagar News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे उद्या (10 मार्च) अहमदनगरमधील (Ahmednagar) पारनेरच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र या दौऱ्याला पारनेर कारखाना बचाव आणि पुनर्जीवन समितीने विरोध दर्शवला आहे. कारखाना बचाव समितीकडून 'शरद पवार-गो बॅक' आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर रात्री पारनेरच्या रस्त्यावर "शरद पवार-गो बॅक' असं लिहिण्यात आलं आहे. जवळा-निघोज आणि निघोज-देवीभोयरे या रस्त्यावर 'शरद पवार-गो बॅक' असा मजकूर लिहित विरोध दर्शवण्यात आला आहे.
शरद पवार यांच्या दौऱ्याला विरोध का?
पारनेर सहकारी साखर कारखाना (Parner Sahakari Sakhar Karkhana) विक्री मागे शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप बचाव समितीने केला आहे. पारनेर साखर कारखान्याची भ्रष्ट मार्गाने विक्री करुन शरद पवारांचे निकटवर्तीय असलेले माजी खासदार विदुरा नवले यांनी तो बळकावल्याचा कारखाना बचाव समितीचा आरोप आहे. यासाठी शरद पवारांनी त्यांना मदत केल्याचे पुरावे असल्याचा दावा समितीने केला आहे. या कारखान्याच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याचं समितीने म्हटलं आहे.
'...तर काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करु'
याबाबत कारखाना बचाव समितीने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यात पारनेर कारखाना विक्रीबाबत एकून पंचवीस प्रश्न उपस्थित केले आहेत. शरद पवारांनी दौऱ्यापूर्वी या प्रश्नांचा खुलासा करावा असं कारखाना बचाव समितीने म्हटलं आहे. या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं न दिल्यास शरद पवारांच्या दौर्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली जाईल, असा इशारा कारखाना बचाव समितीकडून देण्यात आला आहे. त्यात आता रस्त्यावरच 'शरद पवार-गो बॅक' लिहून निषेध करण्यात आला आहे.
शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार?
जवळा इथे उद्धाटन आणि शेतकरी मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी देखील झाली आहे. परंतु बचाव समितीच्या विरोधामुळे आणि त्यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आत शरद पवार येणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
बचाव समितीची औरंगाबाद खंडपीठातील याचिका प्रलंबित
पारनेर सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेने बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी चौकशीची मागणी करणारी याचिका पारनेर साखर कारखाना बचाव समितीने पूर्वीच औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली आहे. पारनेर बचाव समितीने या कारखान्याच्या विक्रीत काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप करुन याची चौकशी ईडीने करावी, अशी मागणी केलेली आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतरच चौकशी करण्यात येईल, अशी भूमिका त्यावेळी ईडीने घेतली होती. समितीने गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी दखल न घेतल्याने प्रकरण पुन्हा न्यायालयात गेलं असून तिथे ते प्रलंबित आहे.