(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik : नाशिकमध्ये जातपंचायत आणि ग्रामपंचायतीचा अजब फतवा! आंतरजातीय विवाह केल्याने विवाहितेचे शासकीय योजनांचे लाभ नाकारले!
Nashik News Updates नाशिकमध्ये जातपंचायत आणि ग्रामपंचायतीचा अजब फतवा काढला आहे. आदिवासी समाजातील मुलीनं आंतराजातीय विवाह केल्यानं तिला शासकीय योजनांचे लाभ नाकारले आहेत.
Nashik News : जातपंचायतीच्या (Jat Panchayat) जाचाची अनेक प्रकरणं आपण ऐकून असाल. पुरोगामी म्हणवल्या महाराष्ट्रात आज 21 व्या शतकात देखील असे प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार नाशिकमधून (Nashik) समोर आला आहे. आंतरजातीय विवाह केल्याने विवाहितेचे शासकीय योजनांचे लाभ नाकारले आहेत. नाशिकमध्ये जातपंचायत आणि ग्रामपंचायतीचा अजब फतवा काढला आहे. इगतपुरी तालुक्यातील रायांबे गावात ही खळबळजनक घटना आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक संस्थांकडून या प्रकरणी आता कारवाईची मागणी होत आहे.
आंतरजातीय विवाह केल्याने विवाहितेकडून ग्रामपंचायत आणि जात पंचायत सदस्यांनी लाभ नाकारण्याचा अर्ज बळजबरीने लिहून घेतला. ठाकर समाजातील तरुणीने अनुसूचित जातीच्या मुलाशी विवाह केल्याने अर्ज लिहून घेतला आहे.
मी भांडणं होतील म्हणून ते लिहून दिलं...
इगतपुरी तालुक्यातील रायांबे गावातील एका मुलीनं आंतरजातीय लग्न केलं. मात्र हे लग्न केल्यानंतर जातपंचायत आणि ग्रामपंचायतील काही लोकांनी तिच्याकडून अनुसूचित जमातीचे सर्व शासकीय लाभ नाकारण्यासंदर्भात पत्र लिहून घेतलं आहे. याबाबत पीडित विवाहितेनं सांगितलं की, मला वाटतं की सर्व सवलती मला मिळाव्यात. मात्र त्यांनी लग्न झाल्याच्या दिवशी संध्याकाळी त्यांनी माझ्याकडून सवलती नाकारण्याबद्दल लिहून घेतलं. मी भांडणं होतील म्हणून ते लिहून दिलं, असंही पीडितेनं सांगितलं.
संबंधितांवर कारवाई करावी - कृष्णा चांदगुडे, अंनिस पदाधिकारी
अंनिसचे पदाधिकारी कृष्णा चांदगुडे यांनी म्हटलं आहे की, आदिवासी समाजातील मुलीनं आंतराजातीय विवाह केल्यानं तिला शासकीय योजनांचे लाभ नाकारले आहेत. तसं तिच्याकडून लिहून देखील घेतलं आहे. शाहू महाराजांच्या स्मृतीदिनी हा प्रकार घडला आहे. शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं होतं. मात्र याच दिवशी असा प्रकार घडला आहे. हा प्रकार अत्यंत अमानुष आहे. या गावचे सरपंच, सदस्य आणि जातपंचायत सदस्यांनी त्या मुलीकडून तसं लिहून घेतलं आहे. हे अत्यंत धोकादायक आणि क्लेषदायक आहे, त्यामुळं संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, अशी माहिती चांदगुडे यांनी दिली आहे.