नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, विखे पाटील याचिका दाखल करणार, अहिल्यानगरमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढले
राज्यभरात बिबट्यांचे पशुबरोबरच माणसांवर देखील हल्ले (Leopard attacks) वाढत चालल्याच्या घटना घडत आहेत. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातही मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ले वाढले आहेत.

Leopard attacks : राज्यभरात बिबट्यांचे पशुबरोबरच माणसांवर देखील हल्ले (Leopard attacks) वाढत चालल्याच्या घटना घडत आहेत. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातही मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या दोन वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 95 नागरिक जखमी झाले आहेत. तसेच 6 हजार 850 जनावरंचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बिबट्या माणसांना मारू शकतो, मात्र बिबट्याला मारण्याची परवानगी नाही. या संदर्भात नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी यासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील हे न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2022 -2023 या कालावधीमध्ये बिबट्याच्या हल्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तर 50 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच 3 हजार 773 जनावरांचा बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामध्ये एकूण 4 कोटी 34 लाख 66 हजार 35 रुपये एवढी मदत शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. तर 2023 -24 मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 7 व्यक्तींचा मृत्यू तर 45 व्यक्ती जखमी झाले आहेत. तर 3 हजार 77 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यासाठी 4 कोटी 90 लाख 79 हजार 327 रुपये एवढी मदत शासनाकडून करण्यात आली आहे.
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा
अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील बिबट्याचा वावर शेतकरी आणि नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. यावर चार दिवसांत उपाययोजना न केल्यास भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पारनेर तालुक्यातील देसवडे, मांडवे, खडकवाडी, टाकळी ढोकेश्वर ,कर्जुले हर्या, पोखरी, वासुंदे या गावांमध्ये बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वीच खडकवाडी या ठिकाणी एका शाळकरी मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या मुलीचा मृत्यू झाला होता. तर देसवडे येथे देखील शेतकरी योगेश गोळे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ते देखील गंभीर जखमी झाले होते. या परिसरात सतत बिबट्याचे हल्ले होत असल्याने शेतकरी आणि गावकरी भयभीत झाले आहेत.
सुजय विखे पाटील जनहित याचिका दाखल करणार
गेल्या काही दिवसात बिबट्याचा मानवी वस्तीत संचार वाढला असून बिबट्याच्या हल्ल्यात अनेक निष्पाप बालकांचा देखील मृत्यू झाला आहे. याबाबत आता जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय माजी खासदार सुजय विखे यांनी घेतला आहे. बिबट्या माणसांना मारू शकतो, मात्र बिबट्याला मारण्याची परवानगी नाही. या संदर्भात नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती सुजय विखे यांनी दिली आहे. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातही बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना शेतात पाणी धरताना अडचणी येत असल्याचे श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
