Ajit Pawar : हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज अहमदनगरच्या अकोलेत दाखल झाली आहे. अकोलेत पोहचताच मुस्लीम समुदायाकडून अजित पवारांचे जंगी स्वागत करण्यात आले.
अकोले : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज अहमदनगरच्या अकोलेत दाखल झाली आहे. अकोलेत पोहचताच मुस्लीम समुदायाकडून अजित पवारांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी अजित पवारांवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. तर लाडक्या बहिणींनी अजित पवारांना राख्या बांधल्या. तर समर्थकांकडून अजित पवारांना विशेष फेटा बांधण्यात आला आहे. त्यामुळे हातात राख्या, डोक्यावर फेटा आणि गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा परिधान केलेल्या अजित पवारांच्या लुकची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
तर दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे गेल्या काही दिवसपासून मुस्लीम समाजाबाबत प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगली होती. मुस्लीमविरोधी वक्तव्यं करणाऱ्या नेत्यांच्या भूमिकेचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. याची दखल घेत अजित पवारांनी भाजप नेत्यांविरोधात थेट दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना अजितदादांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मूळ मतदार आहे, त्यामध्ये अल्पसंख्याक समुदायाचा समावेश आहे. अजित पवार आपल्या भाषणांमधून वारंवार आपण अल्पसंख्याक समाजाच्या बाजूने आहोत, असा विश्वास देत असतात. मात्र, अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांच्या मुस्लीम समाजाविषयीच्या वक्तव्यांबाबत अजित पवार यांची भूमिका काय, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्या वक्तव्याचा अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी चांगलाच समाचार घेतला होता. या प्रकारची वागणूक महाराष्ट्र खपवून घेतली जाणार नाही. कोणत्याही धर्माविरोधात अपमानास्पद टिप्पणी करू नका. अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या नेत्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा अजित पवारांनी दिला.
सर्वधर्म समभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न?
यानंतर आज अजित पवार आज हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा, अशा वेशात दिसून आले. त्यामुळे अजित पवारांकडून सर्वधर्म समभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा चर्चांना आता उधाण आले आहे. तसेच अजित पवारांचा हा संदेश नेमका कुणासाठी आहे? याबाबत देखील अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
अजित पवारांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण
दरम्यान, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचे अकोलेत आगमन झाले. आमदार किरण लहामटे यांच्याकडून यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. अकोले बसस्थानक, बाजारतळ यासह विविध विकास कामांचे लोकार्पण आज अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. तसेच अजित पवारांची अकोले येथे भव्य सभा देखील पार पडणार आहे. हजारो आदिवासी बांधव या सभेला राहणार उपस्थित राहणार असून अजित पवार सभेतून काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
आणखी वाचा
मोठी बातमी : नितेश राणेंवर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र