(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar : परिस्थितीने तिला नवऱ्याची 'आई' बनवले अन् तिने साता जन्माची साथ निभावली; करारी सोनालीचा धडाडीचा जीवनसंघर्ष!
Ahmednagar : विशाल आणि सोनालीने नव्या घराचं स्वप्न रंगवलं... पण त्याच नव्या घरात विशालला स्टेचरवरून आणावं लागलं अन् सुरू झाला सोनालीचा जीवनसंघर्ष.
अहमदनगर: लग्नात साता जन्माच्या आणाभागा घेऊन पती-पत्नी सहजीवनाचा जीवनाचा प्रवास सुरु करतात. अहमदनगरच्या (Ahmednagar) सोनाली आणि विशाल वाघमारे यांनी अशाच पद्धतीने आपला सहजीवनाचा प्रवास सुरु केला. मात्र विशालवर असं एक संकट ओढवलं की जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी दुरावले पण त्याची पत्नी ही त्याच्या सोबत खंबीरपणे उभी राहिली. एवढंच काय तर ती त्याची 'आई' झाली.
अहमदनगरच्या सोनाली आणि विशाल वाघमारे यांचा विवाह 2011 मध्ये झाला. विशाल हा एका फायनान्स कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता. तर सोनाली ही गृहिणी होती. सोनाली आणि विशालचा सुखी संसार सुरू असतानाच 2018 मध्ये विशालला ब्रेन अटॅक आला आणि तो अंथरुणाला खिळला. विशालला ब्रेन अटॅक आल्यानंतर तो पॅरालाईज झाला. तो पहिल्यासारखा बोलू-चालू शकणार नाही हे लक्षात आल्यावर जवळचे नातेवाईक दूर झाले, काही मित्रही दुरावले. ज्याच्यासोबत इंद्रधनुष्याच्या झोक्यावर झोके घेतले, आनंदाला आलिंगन दिले, तोच आता विकल झाला.
नव्या घराचं स्वप्न रंगवलं पण...
मात्र सात जन्म साथ निभावण्याच्या आणाभाका घेतलेली सोनाली मात्र त्याच्या सोबतच आजही खंबीरपणे उभी आहे. अतिशय कमी वयात आणि कोणत्याही प्रकारचे व्यावहारिक ज्ञान नसताना सोनालीवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. विशालला ब्रेन अटॅक येण्याआधीच त्याच्या नव्या घराचे काम सुरू होते. नव्या घराचे स्वप्न रंगवत असतानाच ही घटना घडली आणि ज्या घरात मोठ्या आनंदाने त्यांना पुढचा संसार करायचा होता त्यावेळी विशालला स्ट्रेचरवरून या घरात आणावं लागलं. त्यानंतर सोनालीची खरी अग्निपरीक्षा सुरू झाली.
घरातील कर्ता पुरुष अंथरूणाला खिळल्याने करावे तर काय? असा प्रश्न सोनालीला सतावत होता. जवळचे नातेवाईक दुरावल्याने आणि 'तुझे वय अजून आहे तरी तू वेगळा विचार करायला हवास' असा सल्ला सोनालीला दिला जात होता. सोनालीने मात्र अशा अवस्थेत मी पतीला सोडणार नाही अशी भूमिका घेतली. सोनालीला मुलंबाळ नव्हतं, मात्र ती आता विशालचीच आई झाली आहे. एखाद्या लहान बाळाप्रमाणे ती विशालची काळजी घेते.
घराची जबाबदारी सोनालीने पेलली
घरातील कर्त्या पुरुषाची ही अवस्था झाल्याने सर्व जबाबदारी सोनालीवर येऊन पडली होती. सुरुवातीला सोनालीने मेस सुरू केली, शिवणकाम केलं. मात्र कोरोना काळात तोही व्यवसाय बंद झाला. त्यातच विशालला कोरोना झाला. कोरोनाच्या काळात कुणी कुणाच्या जवळही येत नसल्याने विशालला अशा अवस्थेत तिने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याला दवाखान्यात दाखल करून इतर नातेवाईकांसारखे सोनालीने घरी यायला हवे होते. पण विशाल कोरोना पॉझिटिव्ह असण्यापूर्वी पॅरालाईज आहे, त्याला बोलता-चालत येत नाही, त्याला एकटे सोडून जाण्याची कल्पनाच सोनाली करू शकत नव्हती. मी त्याच्यासोबत राहील असे सोनालीने डॉक्टरांना सांगताच डॉक्टरांनी 'पेशंटसोबत माझे काही बरे वाईट झाल्यास, त्याला मी जबाबदार असेल' असे लिहून घेतले.
शिक्षण घेतलं, नोकरी केली अन् शेतीही सांभाळली
सोनाली चोवीस तास विशाल सोबत होती. विशालची ऑक्सिजन लेव्हल 77 इतकी होती. अशावेळी सोनाली स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेत प्रत्यक्ष सेवा देत होती. पण तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. तिने विशालला कोरोनासारख्या मृत्यूच्या दाढेतूनही मागे आणले. कोरोना काळात मेस बंद झाल्याने पुढे करायचे काय असा प्रश्न सोनालीसमोर होता. बी.एस्सी. बी.एड. पर्यंत शिक्षण झाल्याने तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली स्वतःच्या घरात एक अभ्यासिका सुरू केली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता करता तिने एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नोकरी पत्करली. सोबतच विशालची वडिलोपार्जित चार एकर शेती देखील सोनाली करू लागली. ज्यावेळी नोकरीसाठी घराबाहेर जावं लागतं तेव्हा विशालची काळजी घेण्यासाठी सोनालीची आई पार्वती भवर या असतात.
नवऱ्याची आईप्रमाणे काळजी घेतेय
विशालची काळजी घेत असताना सोनालीसमोर येणाऱ्या अडचणींचे ती कधीही भांडवल करत नाही, तिच्या कामावरही त्याचा परिणाम ती होऊ देत नाही. शाळेची नोकरी, शेती आणि घरातच सुरू केलेली अभ्यासिका यांचे योग्य नियोजन करून ती विशालची अगदी आईप्रमाणे काळजी घेते.
नवरा हा केवळ घरात पैसे कमावून आणणारा आणि नेहमीच परफेक्ट असावा अशी बायकांनी घालून घेतलेली चौकट योग्य नसल्याचे सोनाली सांगते. विशाल जसा आहे तसा फक्त माझ्यासोबत आहे यातच माझं समाधान असल्याचे सोनाली सांगते. खऱ्या अर्थाने सोनाली 'साता जन्माची साथ' देण्याची शपथ पाळत आहे.
ही बातमी वाचा: