Ahmednagar News : एज इज जस्ट अ नंबर, वयाच्या 54 व्या वर्षी दहावीत 54 टक्के गुण, नगरच्या भारती भगत यांचं यश
Ahmednagar News : अंगणवाडी सेविका असलेल्या भारती भगत यांना परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आलं नाही. पण या वयातही बोर्डाची परीक्षा देण्याचा त्यांनी निश्चित केलं आणि त्यात यश देखील मिळवलं.
Ahmednagar News : 'प्रत्येक गोष्टीची एक वेळ आणि एक वय असतं,' हा आपल्याकडे प्रचलित असलेला एक समज आहे. या विचारामुळे किती तरी लोकांच्या आयुष्यात उगीच एक दडपण आलेलं असतं. अमुक या वयातच लग्न व्हायला हवं, असा काहींना आपल्या कुटुंबातील व्यक्तींकडून आग्रह असतो. तर, काहींनी या वयातच तुझं करिअर झालं पाहिजे, या वयात तुला परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे यासाठी स्वतःवर अनेक बंधन लादलेली माणसं आपण पहिली असतील. परंतु वयाच्या 54 वर्षी अहमदनगरच्या (Ahmednagar) भारती भगत यांनी यंदा पार पडलेल्या दहावी परीक्षेत (SSC Result) 54 टक्के गुण मिळवून यश मिळवले आहे. अंगणवाडी सेविका असलेल्या भारती भगत यांना परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आलं नाही. पण या वयातही बोर्डाची परीक्षा देण्याचा त्यांनी निश्चित केलं आणि त्यात यश देखील मिळवलं.
कुटुंबाची जबाबदारी पार पाडत रात्रशाळेत प्रवेश
आपल्याला आपलं अधूर शिक्षण पूर्ण करायचंय हे लक्षात घेऊन त्यांनी कुटुंबाची जबाबदारी पार पाडत, घरकाम आणि अंगणवाडीतील काम सांभाळून त्यांनी रात्रीच्या शाळेत प्रवेश घेत त्यांनी हे यश मिळवलं. त्यात त्यांच्या कुटुंबियांनीही देखील साथ दिली. आपल्या सासुबाईंनी घरकामात मदत करुन नातवाला सांभाळून देखील हे यश मिळवल्याने आपल्या खूप आनंद होत असल्याचं त्यांच्या सुनबाई गायत्री भगत सांगतात.
पुढील शिक्षण पूर्ण करण्याची भारती भगत यांची इच्छा
बोर्डाच्या पेपरला न घाबरता परीक्षेला सामोरे जायला हवे आणि इतरही महिलांनी आपले अधुरे स्वप्न पूर्ण करायला हवे असे भारती भगत सांगतात. सोबतच आपल्याला पुढील शिक्षण देखील पूर्ण करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एकूणच काय तर इच्छाशक्तीच्या जोरावर भारती भगत यांनी Age Is Just A Number' हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
राज्याचा दहावीचा निकाल 93.83 टक्के
दरम्यान राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result) काल (2 जून) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी 92.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.
हेही वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI